कलापी (Kalapi) यांचा जन्म गुजरात राज्यातील अमरेली जिल्ह्यातील लाठी शहरात झाला. कलापी हे लाठीचे राजा होते. राजेशाही वारसा लाभूनही त्यांचे गुजराती साहित्यातील योगदान वाखाणण्याजोगे आहे. कलापी हे त्यांचं टोपणनाव. त्यांचं खरं नाव सुरसिंहजी तख्तसिंहजी गोहिल. त्यांचा जन्म २६ जानेवारी १८७४ रोजी लाठी येथे झाला. त्यांचे वडील महाराजा तख्तसिंहजी लाठी या प्रदेशाचे शासक होते.
दुर्दैवाने कलापी (Kalapi) ५ वर्षांचे असताना तख्तसिंहजी यांचे निधन झाले आणि ते १४ वर्षांचे असताना रमाबा यांचे निधन झाले. त्यामुळे बाल कलापींवर खूप परिणाम झाला. त्यांचं शालेय शिक्षण फारसं झालं नसलं तरी त्यांचा इंग्रजी, संस्कृत आणि गुजराती भाषेचा अभ्यास होता. २६ वर्षांच्या त्यांच्या अल्प आयुष्यात त्यांनी साहित्यात प्रचंड मोठे काम करुन ठेवले आहे. त्यांनी सुमारे २५० कविता लिहिल्या, ज्यात सुमारे १५,००० चारोळ्यांचा समावेश आहे. त्यांनी आपल्या बायकांना आणि मित्रांना सुमारे ९०० पत्रे पाठवली आहेत.
याव्यतिरिक्त त्यांनी ४ इंग्रजी कादंबरींचे गुजरातीत भाषांतर केले आहे. त्यांनी मंदाक्रांता, शार्दुलविक्रीडित, शिखरिणी आणि इतर अनेक छंदामध्ये कविता लिहिल्या आहेत. ’आपनी यादी’ ही त्यांची गुजराती साहित्यातील सर्वोत्कृष्ट गझल मानली जाते. इतक्या कमी वयात त्यांनी जे लिखाण केलं, ते पाहून असं वाटतं की त्यांना जर दीर्घायुष्य लाभलं असतं तर त्यांनी जागतिक महाकवी होण्याचा मान निश्चितच पटकावला असता. त्यांच्या स्मरणार्थ, मुंबई येथील इंडियन नॅशनल थिएटर येथे १९९७ पासून दरवर्षी एका कुशल गुजराती गझल कवीला कलापी पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
Join Our WhatsApp Community