BDD Chawl Project : राजकीय नावे बदलण्याची मागणी

मुंबईतील वरळी येथील प्रकल्पाला ‘स्व. बाळासाहेब ठाकरे नगर’, ना. म. जोशी मार्ग प्रकल्पाला ‘स्व. राजीव गांधी नगर’ व नायगांव येथील बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाला ‘शरद पवार नगर’ असे नामकरण करण्यात आले आहे.

249
BDD Chawl Project : राजकीय नावे बदलण्याची मागणी
BDD Chawl Project : राजकीय नावे बदलण्याची मागणी
  • सुजित महामुलकर

राज्यात शिवसेना-भाजप महायुती सरकार सत्तेत येऊन दीड वर्ष उलटले, मात्र मागील उद्धव ठाकरे सरकारने जाता-जाता बीडीडी चाळींसंदर्भात घेतलेला एक महत्वाचा निर्णय आजही कायम आहे. मुंबईतील वरळी येथील प्रकल्पाला ‘स्व. बाळासाहेब ठाकरे नगर’, ना. म. जोशी मार्ग प्रकल्पाला ‘स्व. राजीव गांधी नगर’ व नायगांव येथील बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाला ‘शरद पवार नगर’ असे नामकरण करण्यात आले आहे. (BDD Chawl Project)

एकाच महिन्यात नामकरण निर्णय, सरकार कोसळले

ठाकरे सरकारने ह्या नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करून ३ जून २०२२ या दिवशी शासन निर्णय जारी केला होता. तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयाची माहिती माध्यमांना दिली होती. तर एकनाथ शिंदे यांनी ३० जून २०२२ या दिवशी महाविकास आघाडी सरकार उलथवले. आता ही नावे बदलण्याची मागणी पुढे येत आहे. (BDD Chawl Project)

(हेही वाचा – BMC : महापालिका रुग्णालयात झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी)

रहिवाशांना विश्वासात घेतले होते का?

नायगाव बीडीडी चाळ येथील रहिवासी आणि श्री हनुमान जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष विजय कणसे यांनी ही नावे बदलण्याची मागणी केली. “ही नावे देताना रहिवाशांना विश्वासात घेतले होते का? किमान नायगावचे नाव बदलण्यात यावे आणि नवे नाव हे शक्यतो राजकीय व्यक्तींच्या नावावरून न ठेवता विभागाच्या नावावरून जसे ‘नायगाव नगर’ ठेवावे. ज्यामुळे कुणाच्याही भावना दुखायचा प्रश्न नाही. बाकी वरळी, ना. म. जोशी मार्ग ( डिलाईल रोड) येथील रहिवाशांनी त्यांच्या विभागाबाबत निर्णय घ्यावा,” असे मत कणसे यांनी व्यक्त केले. (BDD Chawl Project)

१५,५८४ भाडेकरूंचे पुनर्वसन

मुंबई विकास विभागामार्फत (बी.डी.डी.) सन १९२१-१९२५ च्या दरम्यान मुंबईतील वरळी, नायगांव, ना. म. जोशी मार्ग ( डिलाईल रोड) व शिवडी येथे एकूण २०७ चाळी बांधण्यात आल्या आहेत. प्रत्येक चाळ ही तळमजला अधिक तीन मजल्यांची असून त्यात प्रत्येकी साधारण ८० रहिवाशी गाळे आहेत. त्यानुसार बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये जवळपास एकूण १५,५८४ भाडेकरूंचे पुनर्वसन करणे नियोजित आहे. (BDD Chawl Project)

(हेही वाचा – Robbery : मुंबई-आग्रा महामार्गावर 3 कोटींचा दरोडा)

५०० चौ. फूट चटई क्षेत्रफळाची सदनिका

प्रकल्प आराखड्यानुसार बीडीडी चाळींतील निवासी पात्र गाळेधारकांना प्रस्तावित पुनर्वसन इमारतीत ५०० चौ. फूट चटई क्षेत्रफळाची सदनिका विनामूल्य व मालकी तत्त्वावर देण्यात येणार आहे. चाळींबाहेरील निवासी पात्र झोपडीधारकांना ३०० चौ. फूट चटई क्षेत्रफळाची सदनिका विनामूल्य व मालकी तत्त्वावर अनुज्ञेय आहे. (BDD Chawl Project)

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती

सदर जून्या झालेल्या व मोडकळीस आलेल्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प राबविण्यासाठी शासनाने ३० मार्च २०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये म्हाडास सुकाणू संस्था (Nodal Agency) व नियोजन प्राधिकरण (Planning Authority) म्हणून नेमले आहे. तसेच बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत म्हाडास मार्गदर्शन करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समिती (High power committee) आणि १९ ऑगस्ट २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती (High Level committee) गठीत करण्यात आलेली आहे. (BDD Chawl Project)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.