-
ऋजुता लुकतुके
अलीकडे ओडिशा राज्यात पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. आणि इथं पर्यटनाची राजधानी असलेलं शहर आहे अर्थातच पुरी. एका बाजूला बंगालचा उपसागर असलेलं हे शहर इथला विस्तीर्ण समुद्र किनारा आणि प्रसिद्ध मंदिरांसाठी ओळखलं जातं. भुबनेश्वरपासून हे शहर अगदी ६१ किलोमीटरवर आहे. त्यामुळे इथं पोहोचणंही सोपं आहे.
अशा या शहरातील ७ पर्यटन स्थळं जाणून घेऊया,
जगन्नाथपुरी मंदिर
जगन्नाथ मंदिर (Jagannathpuri Temple) हे भारतातील चार धामांपैकी एक धाम आहे. त्यामुळे इथं दर्शनासाठी दरवर्षी लाखो लोक येतात. पुरीतील पर्यटन या मंदिराशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. या मंदिरात भगवान जगन्नाथाबरोबरच भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचीही पूजा केली जाते. विशेष म्हणजे इथल्या मूर्ती लाकडाच्या बनलेल्या आहेत. आणि त्या दर १२ वर्षांनी बदलल्या जातात. या मंदिराचा कळस ६५ मीटर उंच आहे.
दररोज इथं १०,००० भाविक प्रसाद घेऊन जातात. इतक्या लोकांची जेवणाची सोय इथं केली जाते. मंदिराचं बांधकाम पारंपरिक कलिंगा शैलीत केलं आहे.
(हेही वाचा – Igatpuri Accident : ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने अपघात; तीन जखमी)
सुवर्ण तट
पुरीतील समुद्र किनाऱ्याला गोल्डन बीच किंवा सुवर्ण तट म्हटलं जातं. इथल्या सोनेरी वाळूमुळे हे नाव समुद्र किनाऱ्याला मिळालं आहे. वॉटर स्पोर्ट्ससाठी तर हा किनारा प्रसिद्ध आहेच. शिवाय कायम स्वच्छ ठेवला जात असल्यामुळे या किनाऱ्याला ब्लू फ्लॅग हे आंतरराष्ट्रीय मानांकनही मिळालं आहे.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात इथं पाच दिवस पुरी बीच फेस्टिव्हल भरते. इतर मनोरंजन आणि करमणुकीच्या खेळांबरोबरच या काळात वाळू शिल्पही साकारण्यात येतात. देशातील आघाडीचे वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक पुरी किनाऱ्यावरच अनेकदा आपली शिल्प साकारतात.
जगन्नाथ मंदिरात (Jagannathpuri Temple) दर्शन घेणारे भाविक इथं पवित्र स्नानासाठीही येतात.
सुदर्शन हस्त उत्पादनं
सुदर्शन हस्तकला उत्पादनांचं संग्रहालय हे पुरीतील आणखी एक आकर्षण आहे. सुदर्शन साहू यांनी १९७७ मध्ये या संग्रहालयाची स्थापना केली. अगदी जुन्या काळातील देखणी दगडी शिल्पही या संग्रहालयात आहेत.
बालूखंड अभयारण्य
पुरी – कोणार्क या सागरी महामार्गावरच हे अभयारण्य आहे. त्यामुळे याच्या एका बाजूला सुरेख असा सागरी किनारा आहे. आणि दुसऱ्या बाजूला चांगलं वसवलेलं जंगल. काळवीट, हरीण, गेंडा आणि माकडांच्या विविध प्रजाती इथं पाहायला मिळतात.
पुरीपासून हे अभयारण्य २७ किलोमीटरवर आहे. तर कोणार्कहून पुरीला येताना ते मध्ये लागतं.
(हेही वाचा – Gyanvapi Masjid : ज्ञानवापी मशीद हिंदूंच्या ताब्यात द्या, भाजप नेते गिरीराज सिंह यांचे मुस्लिमांना आवाहन)
चिलिका तलाव
चिलिका तलाव हा काही गोड पाण्याचा तलाव नाही. उलट ही खाजणाची जागा आहे. पण, आशिया खंडातील हा सगळ्यात मोठा समुद्रापासून आत असलेला खारा तलाव आहे. आणि याचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे इथं येणारे प्रवासी पक्षी. पाण्यापाशी जमणारे आणि इतर निर्वासित पक्षांचं हे मोठं वस्तीस्थान आहे.
खासकरून सैबेरिया, मध्य आशिया आणि अगदी हिमालयातून थंडीत पक्षी इथं स्थलांतरित होतात. आणि फक्त त्यांना बघायला इथं हजारो पक्षीप्रेमी येतात.
पुरीपासून हे ठिकाण ४४ किमीवर आहे. इथं फ्लेमिंगोंसह सी ईगल्स, ग्रेलॅग गीज्, पर्पल मूरन हे पक्षी प्रामुख्याने येतात.
नरेंद्र पोखरी
मित्र किंवा कुटुंबीयांबरोबर सहलीला जायचं इथल्या लोकांचं लाडकं ठिकाण आहे ते नरेंद्र पोखरी. पुरीतील हे ठिकाण पवित्रही मानलं जातं. कारण, भगवान जगन्नाथ इथं पवित्र स्नान करायचे, असा लोकांचा समज आहे. जगन्नाथ मंदिरापासून हे ठिकाण जवळच आहे.
इथं तलावाच्या मधोमध छोटं बेट आहे. आणि भोवती काही मंदिरं आहेत. बेटाच्या भोवती १६ घाट बांधण्यात आले आहेत. आणि तिथे भाविक पवित्र स्नान करू शकतात. हिंदू दिनदर्शिकेतील वैशाख महिन्यात इथं भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
रघुराजपूर खेडं
रघुराजपूर हे राजस्थानातील कलाग्रामांसारखं एक खेडेगाव आहे. गावातील लोकांनी बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू आणि कपडे इथं छोट्या छोट्या दुकानांमधून विक्रीसाठी ठेवण्यात येतात. गावातील एका रस्त्यावर दुतर्फा गवताने लिंपलेल्या कुडाच्या भिंती असलेली घरं आहेत. आणि इथेच या वस्तू ठेवण्यात येतात.
इथली सारा कला ही नावाजलेली आहे. तर पट्टचित्र ही नारळाच्या झावळ्यांवर केलेली चित्रकलाही इथं प्रसिद्ध आहे. नारळाच्या विविध भागांपासून बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू हे इथलं वैशिष्ट्य आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community