पावसाळी पाण्याचा उपसा करणाऱ्या पंपाच्या निविदेलाच राष्ट्रवादीचा आक्षेप

जाणीवपूर्णक आपल्या मर्जीतील कंपनीला काम देण्यासाठी अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे निविदा मागवण्याचा घाट घातल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी केला आहे.

110

मुंबईत वेगवेगळ्या सखल भागांमध्ये पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी बसवण्यात येणारे पंप भाडेतत्वावर घेण्यासाठी निविदा मागवण्यात येत आहेत. पण या निविदेमध्ये एकाच कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी केवळ तीन दिवसांचा निविदा भरण्याचा कालावधी देण्यात आल्याने, याला राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या पंपांची खरेदी निविदेपूर्वीच वादात सापडण्याची शक्यता आहे.

मलिक यांचा आरोप

मुंबईत पावसाळ्यात ज्या-ज्या सखल भागांमध्ये पाणी साचते, त्या भागांमध्ये पाण्याचा जलदगतीने उपसा करणारे पंप बसवले जातात. येत्या पावसाळ्यात असे सुमारे ४७० पंप बसवले जाणार असून, हे पंप भाडेतत्वावर घेऊन ठिकठिकाणी बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे भाडेतत्वावर हे पंप घेण्यासाठी कंत्राटदारांची निवड करण्याकरता महापालिकेच्यावतीने निविदा मागवण्यात आली आहे. महापालिकेने २८ एप्रिल रोजी निविदा मागवल्या आणि ३ मेला त्याची अंतिम तारीख ठेवली. पण यातील १ व २ मे हे सुट्टीचे दिवस होते. त्यामुळे प्रत्यक्षात कामकाजाचे केवळ चारच दिवस होत असून, जाणीवपूर्णक आपल्या मर्जीतील कंपनीला काम देण्यासाठी पर्जन्य जलवाहिनी विभागातील अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे निविदा मागवण्याचा घाट घातल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी केला आहे.

(हेही वाचाः मुंबईत चाळीशीच्या आतील रुग्णसंख्या दीड महिन्यातच दुप्पट!)

आठ दिवसांचा कालावधी देण्याची मागणी

निविदा मागवण्याचा कालावधी हा कामकाजाच्या सात दिवसांचा आहे. पण शनिवार-रविवारची संधी साधून ही निविदा काढली जात आहे. त्यामुळे या निविदेला मुदतवाढ दिली जावी, अशी मलिक यांनी मागणी केली आहे. तसेच सध्या यासाठी केवळ ३ कंपन्यांनीच भाग घेतला असून, या तिन्ही कंपन्यांनी संगनमत करुन निविदा भरल्याचाही आरोप मलिक यांनी केला. पंप भाडेतत्वावर घेण्याची प्रक्रिया दर वर्षीची आहे. त्यामुळे आताच एवढी घाई नाही. याकरता नियमानुसार निविदा प्रक्रिया व्हायला हवी. यासाठी निविदेची मुदत आठ दिवसांनी वाढवून देण्यात यावी किंवा ही प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी आपण महापालिका प्रशासनाकडे पत्राद्वारे मागणी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.