मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन आणि जरांगे पाटील विषयावर तोडगा काढला, मात्र त्यानंतर भाजपमध्येच दोन गट तयार झाल्याचे दिसून येते. ओबीसी आरक्षणाला (OBC reservation) ‘धक्का लागला’ आणि ‘नाही लागला’ असे मानणारे दोन विचार आमदारांमधून पुढे आले. विशेष म्हणजे मोठ्या पदावरील नेते ‘धक्का लागला नाही’, असे मानणारे, तर ‘धक्का लागला’ म्हणणाऱ्यांमध्ये माजी मंत्री आहेत.
(हेही वाचा – Pushkar Jog : विरोधात महापालिकेत वातावरण तापले, कामगार संघटनांनी केली कारवाईची मागणी)
अधिसूचनेवरून वादळ
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जरांगे पाटील यांना आश्वासन देत सगेसोयाऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल, ही मागणी मान्य केली आणि एक अधिसूचना हातात ठेवली. यावरून ओबीसी समाजात वादळ उठले असून सत्ताधारी भाजपमध्येच दोन गट तयार झाले आहेत.
राम शिंदे, पडळकर भुजबळांच्या कंपूत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, असे स्पष्टीकरण दिले असतांनाही त्यांच्यावर विश्वास न ठेवता अन्य नेते थेट माध्यमांकडे नाराजी व्यक्त करत आहेत. भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट आरोप करत “ओबीसीला कसा धक्का लागला नाही, हे सत्तेत असलेल्यांनी समजावून सांगावं,” असा टोला हाणला. माजी मंत्री राम शिंदे आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत शासन निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी केली. भुजबळ यांच्या बंगल्यावर दोघे बैठकीला गेले होते.
(हेही वाचा – ज्ञानवापी हे मूळ हिंदू मंदिर असल्याचे दाखवणारे अवशेष)
एकमेकांच्या विरुद्ध प्रतिक्रिया देणे, हे योग्य नाही
“आताचा निर्णय हा सरसकट कुणबी प्रमाणपत्र (Kunbi certificate) देण्याचा निर्णय नाही. ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांना प्रमाणपत्र कसे सुलभतेने मिळेल, एवढाच निर्णय आहे. माध्यमांतील आकड्यांवर किंवा विषयांवर दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरुद्ध प्रतिक्रिया देणे हे योग्य नाही. कोणत्याही समाजावर अन्याय न करण्याचीच सरकारची अतिशय स्पष्ट भूमिका आहे,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. “भाजप जोपर्यंत सत्तेत आहे, तोवर आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. जेव्हा असे वाटेल की, काही अडचणी आहेत, तेव्हा मी स्वत: वरिष्ठांशी बोलेन,” असेही ते म्हणाले.
धक्का कसा नाही, सत्ताधाऱ्यांनी समजावून सांगावं
भाजप नेत्या मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारला जाब विचारला. “कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मराठा समाज ओबीसी मध्ये येणार. त्यामुळे ओबीसीला धक्का लागला नाही, असं म्हणणं अयोग्य होईल. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला यामुळे नक्कीच धक्का लागला आहे. आता जे सत्तेत आहेत ते जर म्हणत असतील, धक्का लागला नाही, तर तो कसा लागला नाही, ते त्यांना ओबीसीना समजावून सांगावं लागेल. आता ओबीसींनी संयमाची, मोठेपणाची भूमिका घेतली आहे. आता जरांगे पाटलांना ओबीसीत घेतलंच आहे, तर त्यांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ नाही तर ‘एक ओबीसी लाख ओबीसी’ म्हणावं,” असेही त्या म्हणाल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community