मागील तीन महिन्यांपासून केवळ राजकीय आकसापोटी मालाड पी-उत्तर विभागासाठी सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या विभागातील सोयी-सुविधांकडे लक्ष देताना पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोष धोंडे यांना तारेवरची कसरत करावी लागत असून याचा परिणाम येथील नागरी सेवा सुविधांवर होत आहे. त्यामुळे येत्या सात दिवसात पालिकेने नवीन सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती मालाडच्या पी उत्तर विभागासाठी न केल्यास आपण थेट न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशाराच भाजपा उत्तर मुंबई अध्यक्ष व बेस्ट समिती सदस्य गणेश खणकर यांनी पालिका आयुक्तांना पत्राद्वारे दिला आहे.
(हेही वाचा : ‘ड्राईव्ह इन’ लसीकरणाच्या उद्घाटनात महापौर ‘आऊट’!)
राजकीय दबावापोटी दुर्लक्ष केले जात आहे!
पी -उत्तर विभागातील सहाय्यक आयुक्त संजोग कबरे यांची उपायुक्त पदावर बढती झाली असून गेल्या तीन महिन्यांपासून सहाय्यक आयुक्त पद रिक्त आहे. या विभागाचा अतिरिक्त कार्यभार पी दक्षिणचे सहाय्यक आयुक्त संतोष धोंडे यांच्याकडे देण्यात आला आहे. मालाड पूर्व व पश्चिम हा घनदाट लोकसंख्येचा अठरा नगरसेवक असलेला मुंबईतील मोठ्या विभागापैकी एक आहे. मढ मालवणी या भागात सुरू असलेली अनधिकृत बांधकामे, मोकळ्या जागांवरील भराव त्यामुळे सुविधांवर पडत असलेला ताण लक्षात घेता या विभागात पूर्णवेळ अधिकाऱ्यांची गरज आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही या विषयाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. केवळ राजकीय दबावापोटी ही अवस्था अशीच सुरु राहावी, असा छुपा हेतू तर नाही ना, अशी शंका खणकर यांनी उपस्थित केली आहे. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या सात दिवसांत नवीन सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती न झाल्यास थेट न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा खणकर यांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community