कोविड-१९ लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबई महापालिकेला सुमारे १ लाख लसींचा साठा ४ मे रोजी सायंकाळी देण्यात आला असून, तो रात्री उशिरापर्यंत मुंबईत दाखल होईल. ५ मे रोजी सकाळी हा साठा वितरित केला जाणार आहे. त्यानंतर मुंबईतील शासकीय व महानगरपालिका कोविड लसीकरण केंद्रांवर दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत ४५ वर्ष व त्यावरील वयोगटाचे पूर्वीप्रमाणे नियमित लसीकरण होणार आहे.
नियमित लसीकरण
४५ वर्ष व त्यावरील वयोगटामध्ये पहिला व दुसरा असे दोन्ही डोस पात्र नागरिकांना देण्यात येतील. मात्र, यामध्ये पहिला डोस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कोविन ॲपमध्ये नोंदणी केलेली असणे बंधनकारक आहे. तर दुसरा डोस घेण्यासाठी थेट येणाऱ्या (वॉक इन) नागरिकांनाही लस देण्यात येईल. पहिला व दुसरा अशा दोन्ही डोससाठी लसीकरण केंद्रांवर स्वतंत्र रांग असेल. या वयोगटातील पात्र नागरिकांचे लसीकरण करताना ८० टक्के नोंदणीकृत तर २० टक्के थेट येणारे नागरिक यांना सामावून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ही विभागणी निश्चित करण्यात आली आहे.
१८-४४ वयोगटासाठी लसीकरण
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचा विचार करता, सध्या सुरू असलेल्या व्यवस्थेप्रमाणे, मुंबई महापालिकेच्या निर्देशित ५ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी ५०० नागरिक याप्रमाणे, ५ मेला देखील सकाळी ९ ते ५ या नियमित वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. हे लसीकरण केवळ कोविन ॲपमध्ये नोंदणी केलेल्या आणि ज्यांना निर्धारित लसीकरण केंद्र आणि वेळ दिलेली आहे, अशा व्यक्तींसाठी असणार आहे.
इथे होणार लसीकरण
- बा. य. ल. नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर).
- सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)
- डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).
- सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).
- वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.