जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या चौकशीत अडकलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना अखेर बुधवार, ३१ जानेवारी रोजी रात्री राज्यपाल यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यानंतर आता झारखंड मुक्ती मोर्चाच्या वतीने चंपाई सोरेन यांना नवीन मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चंपाई सोरेन हे हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या अत्यंत जवळचे मानले जात आहेत.
(हेही वाचा Gyanvapi : देशभरात गाजलेल्या ज्ञानवापीचा काय आहे इतिहास? )
ईडीकडून अटक होण्याची शक्यता
जमिनी घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली असून हेमंत सोरेन यांना केव्हाही अटक होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. चंपाई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार असून थोड्याच वेळात राज्यपाल त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देतील. तर कोणत्याही क्षणी हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीकडून अटक होण्याची शक्यता आहे. हेमंत सोरेन यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. याआधी हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र कुटुंबातून विरोधाचा आवाज उठवला जात होता. त्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चंपाई सोरेन यांची नेतेपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 81 सदस्यीय झारखंड विधानसभेत सत्ताधारी आघाडीचे 48 आमदार आहेत. यामध्ये हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाकडे 29, काँग्रेसकडे 17, आरजेडीकडे एक आणि सीपीआय (एमएल) कडे एक आमदार आहे. विरोधी पक्ष एनडीएकडे 32 आमदार आहेत. यामध्ये भाजप 26, एजेएसयु 3, एनसीपी (एपी) 1 आणि 2 अपक्ष आमदारांचा समावेश आहे. तसेच एक जागा रिक्त आहे.
Join Our WhatsApp Community