ठाकरे सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कधी प्रयत्नच केले नाहीत. ना कधी या समाजाच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले. या ठाकरे सरकारने आणि त्यांच्या मंत्र्यांनी असे समजू नये की, मराठा समाज शांत आहे म्हणजे तो सहनशील आहे. जेव्हा उद्रेक होईल तेव्हा या ठाकरे सरकारला आणि त्यांच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात लपायलाही जागा मिळणार नाही, हे लक्षात ठेवा, अशी तिखट प्रतिक्रिया रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे माजी खासदार, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी दिली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे फेल झालं आहे. सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही ह्याचं खापर पण केंद्र सरकारवर टाका. फार मोठ्या प्रमाणावर मराठा तरुणांचा नुकसान झालेलं आहे. त्यांच भवितव्य अंधारात ढकलण्याच काम ठाकरे सरकारने केलंय. या ठाकरे सरकारचा जाहीर निषेध!
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 5, 2021
ठाकरे सरकार असेपर्यंत आरक्षण नाहीच
मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर, राज्य सरकारला मोठी चपराक बसली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना निलेश राणे बोलत होते. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आश्चर्य वाटलं नाही. कारण ठाकरे सरकार असेपर्यंत आरक्षण मिळणारच नव्हते आणि त्यांच्या मनातही ते नाही. अशोक चव्हाण जोपर्यंत या समितीवर आहेत तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, हे गेल्यावेळीच मी सांगितले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार असोत किंवा पवार साहेब असोत, त्यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाच नव्हती. ते कधीही मराठ्यांच्या बाजूने बोलले नाहीत, असं निलेश राणे म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याकरिता कधी पवार साहेबांचे अदृश्य हात जाणवले नाहीत पण मराठ्यांना आरक्षण मिळूच नाही याकरिता अनेक वेळा त्यांची भूमिका जाणवली. ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचे सगळ्या बाजूने तीन तेरा वाजवले. अशोक चव्हाण साधे केळी विकायच्या लायकीचे नाहीत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 5, 2021
…तर त्याला सरकार जबाबदार
ठाकरे सरकारने आता मराठ्यांचा अंत पाहू नये. असंख्य मराठा तरुणांना रस्त्यावर आणण्याचं पाप ठाकरे सरकारने केलं आहे. तरुण त्यांना कधीच माफ करणार नाहीत. मराठा समाज शांत आहे, याचा अर्थ तो सहनशील नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावर तातडीने तोडगा काढा, पण तरुणांच्या जीवाशी खेळू नका. जर ती आग त्यांच्या मस्तकात गेली आणि उद्रेक झाला, तर त्याला ठाकरे सरकार जबाबदार असेल, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community