मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाद्वारे भायखळा पूर्व परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात (Rani Baug Flower Show) आयोजित वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या हस्ते २ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले. वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनातील यंदाच्या पुष्पोत्सवात ‘अॅनिमल किंग्डम’ ही संकल्पना घेवून उद्यान विभागाने हत्ती, वाघ आणि झेब्रा आदींच्या पुष्पप्रतिकृती साकारल्या आहेत. याशिवाय पुष्पोत्सवात विविधरंगी फुलझाडे, फळझाडे-भाजीपाल्यांचाही समावेश आहे. यासाठी तब्बल दहा हजार कुंड्यांचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर पाना-फुलांपासून साकारलेले ‘चांद्रयान’ प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आले आहे.
(हेही वाचा – Government Internships : गव्हर्नमेंट इंटर्नशिप करण्याचे ५ मुख्य फायदे कोणते आहेत?)
याप्रसंगी उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी, उपायुक्त (शिक्षण) चंदा जाधव, संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. पुष्पोत्सवाला अभिनेता रणजित यांनीही भेट दिली.
प्रदर्शनाची वेळ सकाळी ८ ते रात्री ८ –
हे प्रदर्शन रविवारी ४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत, सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत सर्वांसाठी मोफत खुले असणार आहे. प्रदर्शनासोबतच उद्यान विषयक वस्तुंच्या विक्रींची दालने, फुले-फळे झाडांसाठी लागणारे खत आदींची दालने देखील या ठिकाणी उभारण्यात आली आहेत.
(हेही वाचा – BMC Budget 2024-25 : महापालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत काय आहेत प्रतिक्रिया, जाणून घ्या)
अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांनी पुष्पोत्सवातील विविध दालनांना भेट दिली. पुष्पोत्सवात बहरलेली फुलझाडे पाहून भिडे यांना देखील छायाचित्रण करण्याचा मोह आवरला नाही. अनेक फुलझाडांची छायाचित्रं त्यांनी टिपली.
दिग्ग्जांसह चिमुकल्यांनी दिली प्रदर्शनाला भेट –
शुक्रवारी सकाळपासून उद्यानातील प्रवेशद्वाराजवळच साकारण्यात आलेल्या पुष्पोत्सवाला भेट देण्यासाठी मुंबईतील शाळांच्या सहलींची गर्दी झाली होती. पुष्पोत्सव पाहण्यासाठी आलेले चिमुकले विविधरंगी आणि सुगंधी फुलांसोबत रमलेले पाहुन अनेकांनी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद भ्रमणध्वनीतील कॅमेऱ्याद्वारे टिपला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community