अयोध्येच्या (ayodhya) राम मंदिरात रामलल्लाला (Ramlalla Darshan) विराजमान होऊन तब्बल १२ दिवस झाले आहेत. या ११ दिवसांत २५ लाखांहून अधिक भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. याशिवाय दररोज सरासरी एक कोटी रुपये रामलल्लाला अर्पण केले जात आहेत. गेल्या ११ दिवसांत रामलल्लाला मिळालेल्या प्रसाद आणि दानाची किंमत १३ कोटी रुपयांहून अधिक आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्रानुसार, गेल्या १० दिवसांत सुमारे ८ कोटी रुपये दानपेटीत जमा झाले असून, सुमारे ३.५० कोटी रुपये ऑनलाइन प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मोठ्या उत्साहात २२ जानेवारी रोजी राम मंदिरात रामलला विराजमान झाले. २३ जानेवारीला राम मंदिर सर्वसामान्य भक्तांसाठी खुले झाल्यापासून भाविकांची गर्दी होत आहे. रामदर्शनाची आस लागलेल्या लाखो भाविकांची अयोध्यावारी सुरू आहे. उत्तर प्रदेशात थंडी कायम आहे, मात्र भाविकांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही. कडाक्याची थंडी आणि धुक्याची पर्वा न करता रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविक पहाटेपासून रांगा लावताना दिसत आहेत.
राम मंदिरात दररोज सरासरी दोन ते अडीच लाख भाविक राम दर्शन घेण्यासाठी येतात. मिळालेल्या माहितीनुसार, २३ तारखेला २.६२ कोटी रुपयांचे धनादेश, २७ लाख रोख, २४ जानेवारीला १५ लाख रुपयांचे धनादेश आणि रोख, २५ जानेवारीला ४० हजार रुपयांचा धनादेश आणि ८ लाख रुपये रोख, २६ जानेवारीला १,०४,६०० रुपयांचे धनादेश आणि ५.५० लाख रुपये रोख, २७ जानेवारीला १३ लाखांचे धनादेश आणि ८ लाख रुपये रोख, २८ जानेवारीला १२ लाखांचे धनादेश आणि रोख, २९ जानेवारीला ७ लाख रुपयांचा धनादेश आणि ५ लाख रुपये रोख दान आले आहे. या आकडेवारीनुसार राम मंदिरासाठी येणारे दान हे दानपेटीत टाकल्या जाणाऱ्या दानापेक्षा वेगळे आहे. एका अंदाजानुसार, दानपेटीत दररोज ३ लाख रुपयांची देणगी टाकली जात आहे.
वार्षिक उत्सवांचे वेळापत्रक जाहीर
दरम्यान मुख्यमंत्री योगी यांच्यासह भाजपाचे सर्व आमदार ११ फेब्रुवारीला रामललाचे दर्शन घेणार आहेत. नव्याने बांधलेल्या राम मंदिराचे वार्षिक उत्सवांचे वेळापत्रक तयार आहे. नवीन मंदिरात १४ फेब्रुवारीला वसंती पंचमी हा पहिला उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. यामध्ये देवी सरस्वतीची पूजा केली जाणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. राम मंदिरात वर्षभरात १२ प्रमुख सण आणि उत्सव साजरे केले जाणार आहेत.
देणगी काउंटरवर मंदिर ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती
न्यासाचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भगृहासमोरील दर्शन मार्गाजवळ चार मोठ्या आकाराच्या दानपेट्या ठेवण्यात आल्या असून, त्यामध्ये भाविक दान करीत आहेत. याशिवाय १० संगणकीकृत काउंटरवरही लोक देणगी देतात. या देणगी काउंटरवर मंदिर ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते संध्याकाळी काउंटर बंद झाल्यानंतर मिळालेल्या देणगी न्यासाच्या कार्यालयात जमा करतात. ११ बँक कर्मचारी आणि मंदिर ट्रस्टच्या तीन कर्मचाऱ्यांसह १४ कर्मचाऱ्यांची टीम चार दानपेट्यांमधील दानाची मोजणी करते. देणग्या गोळा करण्यापासून ते मोजण्यापर्यंत सर्व काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निरीक्षणाखाली केले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community