श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत पूज्य स्वामी श्रीगोविंददेव गिरिजी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj) यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने आळंदी नगरी सज्ज झाली आहे. रविवारी, ४ फेब्रुवारी रोजी मलुक पीठ, वृंदावनचे संत राजेंद्रदास महाराज यांच्या उपस्थितीत धार्मिक अनुष्ठान करण्यात आले. याप्रसंगी देशभरातील साधुसंतांच्या उपस्थितीने इंद्रायणीकाठी संतांचा मेळा भरल्याचीच अनुभूती होत होती. सुमारे जवळपास पंधरा हजारांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर माऊलींना अभिषेक व त्यानंतर झालेल्या वारकरी सन्मान सोहळ्याने शुभारंभ झालेला गीताभक्ति अमृत महोत्सव ११ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
धर्मरक्षा आणि राष्ट्र निर्माणासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे पूज्य स्वामी श्रीगोविंददेव गिरिजी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj) संत परंपरेचे प्रचारक आहेत. दरवर्षी स्वामींचा जन्मदिवस गीताभक्ति दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र यावर्षी स्वामींच्या जीवनाची 75 वर्षे पूर्ण होत असल्याने संलग्न संस्थांनी ‘गीताभक्ति अमृत महोत्सवा’चे आयोजन केले आहे. रविवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना अभिषेक व त्यानंतर वारकरी सत्कार, यज्ञ विधीचा शुभारंभ व कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तपोमूर्ती कल्याणदास महाराज, ह.भ.प. संदीपन महाराज शिंदे व ह.भ.प. भास्करगिरि महाराज यांची किर्तने संपन्न झाली.
इंद्रायणी काठी सुरु झालेल्या गीताभक्ती अमृत महोत्सवासाठी 70 हजार चौरस फुटांचा भव्य मांडव उभारण्यात आला आहे. मंचावरील कार्यक्रम प्रत्येक भाविकाला व्यवस्थित पाहता यावेत यासाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे. अध्यात्म, संस्कृती आणि उत्सव यांचा अनोखा भक्तीपूर्ण संगम आळंदीत झाला असून या सोहळ्यासाठी पुढील आठ दिवस देशभरातील साधुसंतांसह दिग्गज राजकीय नेते व मान्यवर हजेरी लावणार आहेत.
Join Our WhatsApp Community