भांडुप येथील ड्रिम मॉलला लागलेल्या आगीच्या दुघर्टनेमध्ये सनराईज रुग्णालयातील १८ रुग्णांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. या घटनेची चौकशी आठ दिवसांमध्ये करण्याचे आयुक्तांचे निर्देश होते. पण याची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यालाच कोरोना झाला असून, कोरोनामुळे १ महिना १० दिवस उलटूनही याचा अहवाल तयार झालेला नाही. त्यामुळे याविरेाधात आपण न्यायालयात जाणार असल्याचे भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले आहे.
चौकशीचा अहवाल नाही
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सनराईज रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या चौकशीचा अहवाल १ महिना १० दिवस पूर्ण झाले, तरी आलेला नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या आगीच्या चौकशीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनी अद्यापही अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे याची चौकशी का होत नाही. मृतांच्या नातेवाईकांना अद्यापही त्यांच्या जबाबाच्या नोंदी दिल्या जात नाहीत. त्यामुळे पोलिस महासंचालकांची भेट भाजपच्या शिष्टमंडळाने घेऊन त्यांच्याही निदर्शनास ही बाब आणून दिली. पोलिस आयुक्तांना याची चौकशी करण्याचे निर्देश आहेत. याची प्रोविजनल ओसी ही व्हॉट्सअपवर दिली गेली आहे आणि त्यानंतरही त्यांनी आग प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी न केल्यामुळे, उपप्रमुख अभियंता यांनी त्यांची परवानगी रद्द करण्यात यावी, असे नमूद केले होते. तसेच स्थानिक नगरसेविकेनेही आग लागून दुघर्टना होण्याची भीती वर्तवली होती. या सर्व बाबींनंतर स्थायी समितीत आवाज उठवूनही जर याचा चौकशी अहवाल येत नसेल, तर आम्ही यापूर्वी दिलेल्या इशाऱ्यानुसार याविरेाधात न्यायालयात दाद मागू असे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.
(हेही वाचाः लसीकरणाच्या नियोजन अभावी जनता त्रस्त!)
वेगळा न्याय का?
यावर प्रशासनाच्यावतीने सनराईज रुग्णालयाच्या आगीची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या उपायुक्त प्रभात रहांगदळे यांना कोरेानाची लागण झाल्याने, याच्या चौकशीला विलंब झाल्याचे सांगितले. पण सव्वा महिन्यानंतर जर चौकशी अहवाल येणार नसेल तर काय म्हणावे, असा सवाल करत प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. सनराईज आगप्रकरणी वेगळा न्याय आणि विरारच्या रुग्णालयामधील आगीप्रकरणी वेगळा न्याय का, असाही सवाल त्यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community