- ऋजुता लुकतुके
भारत आणि इंग्लंड दरम्यानची दुसरी विशाखापट्टणम कसोटी चार दिवसांत संपल्यानंतर इंग्लिश संघ आता सुट्टीसाठी काही दिवस आबूधाबीला जाणार आहे. राजकोटच्या तिसऱ्या कसोटीपूर्वी दोन्ही संघांकडे १० दिवसांची सुटी आहे. आणि हा वेळ इंग्लिश संघ आधी ठरल्याप्रमाणे आबूधाबीला घालवणार आहे. भारतात येण्यापूर्वी संघाने मालिकेसाठीचा सरावही तिथेच केला होता. उर्वरित मालिकेपूर्वी थोडा विरंगुळा आणि संघाला एकत्र आणण्याच्या दृष्टीने ही सुटी आखण्यात आली आहे. या कालावधीत संघ क्रिकेट बरोबरच गोल्फ आणि स्विमिंगचा आनंद लुटणार आहे. (Ind vs Eng Test Series)
मालिकेतील पहिली हैद्राबाद कसोटी इंग्लिश संघाने २८ धावांनी जिंकली होती. तर भारताने विशाखापट्टणम कसोटी १०६ धावांनी जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय वातावरणाचा सराव व्हावा यासाठी इंग्लिश संघाने आबूधाबीतच वेळ घालवला होता. किंबहुना, भारतात सराव सामने खेळण्याऐवजी त्यांनी आबूधाबीत विशिष्ट सराव करण्याला पसंती दिली होती. (Ind vs Eng Test Series)
England team will not be staying in India for the next few days and will instead travel back to Abu Dhabi. They will be back in India just a few days before the start of the third Test in Rajkot. #INDvsENG
— Rahul Rawat (@rawatrahul9) February 5, 2024
९ बळी मिळवत जसप्रीतने कसोटी भारताला जिंकून दिली
या कालावधीत संघातील फलंदाजांनी भारतीय फिरकीपटूंना कसं खेळायचं याची चांगली व्यूहरचना आखली आणि तसा सरावही केला. पहिल्या कसोटीत त्याचं फळही त्यांना मिळालं. स्विप आणि रिव्हर्स स्विपचा प्रभावी वापर करत पहिल्या कसोटीत त्यांनी भारतीय गोलंदाजांना जेरीला आणलं. इतकंच नाही तर ही कसोटी त्यांनी जिंकलीही. दुसऱ्या कसोटीत मात्र जसप्रीत बुमराच्या स्विंग आणि रिव्हर्स स्विंग गोलंदाजीने त्यांना चकवलं. सामन्यात ९ बळी मिळवत जसप्रीतने ही कसोटी भारताला जिंकून दिली. (Ind vs Eng Test Series)
चौथ्या डावात विजयासाठी ३९९ धावांची गरज असताना इंग्लिश संघ २९२ धावांत आटोपला. पण, फिरकीपटूंना बिनधास्तपणे खेळण्याचं धोरण इंग्लिश फलंदाजांनी सोडलं नाही. आणि चौथ्या डावातही जवळ जवळ ३०० धावांची मजल मारली. त्यामुळे इंग्लिश संघाने प्रतिकूल वातावरणात दोन्ही कसोटींत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ५ कसोटींच्या या मालिकेची रंगतही वाढली आहे. तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोटला सुरू होणार आहे. तर पुढील दोन कसोटी रांची आणि धरमशाला इथं होणार आहेत. (Ind vs Eng Test Series)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community