गाणं जगायला शिकवतं, असं म्हणतात. मानवी भावभावना, संवेदनांना जागृत करण्याचं काम गाणं करतं. ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद आणि सामवेदामध्येही गायन कलेबाबत तपशिलवार माहिती देण्यात आली आहे. आपल्या ऋषिमुनींनीही मनुष्यातील आंतरिक गुणांच्या विकासासाठी गायन कलेचे महत्त्व सांगितले आहे. गाणी जुन्या आठवणींना उजाळा देतात. सुख, दु:ख, आनंद, मनातील वेदना…माणसाच्या आयुष्यातील अनेकविध प्रसंगांच्या क्षणी गायकांनी गायलेली सुमधुर गाणी कोणत्या रसिकाला ऐकाविशी वाटणार नाहीत? (Best singer in india)
भारतीय संगीत क्षेत्रात अनेक ज्येष्ठ गायक-गायिकांनी आपले योगदान दिले आहे. संगीत क्षेत्रात गेल्या 7 दशकांच्या कारकिर्दीत अनेक गायक-गायिकांनी आपल्या सुमधुर आवाजात रसिक प्रेक्षकांना विविध प्रकारची गाणी ऐकवली. या लेखाद्वारे भारतातील १० गायकांची ओळख करून घेऊया, ज्यांचे भारतीय संगातीला महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे.
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर
भारतातील महान आणि प्रतिभावान गायकांपैकी एक ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर. भारतीय संगीत क्षेत्रांमध्ये ७ दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी भारतीय गानकोकिळा आणि क्विन ऑफ मेलडी या सन्माननीय पदव्या त्यांना मिळाल्या आहेत. लता मंगेशकर यांनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती. त्यांना भारत सरकारने १९८७ साली दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना २००१मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळवणाऱ्या एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्यानंतर त्या दुसऱ्या गायिका आहेत. २००७ साली फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘द लीजन ऑफ ऑनर’ने सन्मानित केले आहे. त्यांना ३ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, ४ फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, २ फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले आहेत. १९७४ मध्ये लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या.
पंडित भीमसेन जोशी
पंडित भीमसेन जोशी हे हिंदुस्थानी शास्त्रीय परंपरेतील कर्नाटकातील महान भारतीय गायक होते. ते गायनाच्या ख्याल प्रकारासाठी तसेच भक्तीसंगीतातील भजन, अभंग आणि ठुमरी सादरीकरणासाठी ते ओळखले जातात. पंडितजी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या किराणा घराणा परंपरेशी संबंधित आहेत. पंडितजींना लहानपणासूनच संगीताची खूप आवड होती. संगीतातील किराणा घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खान यांचा पंडित भीमसेन जोशींवर प्रभाव होता. शास्त्रीय संगीत गुरुंच्या शोधात ते घरातून १९३३ साली बाहेर पडले. १९३७ पर्यंत पंडित भीमसेन जोशी यांना एक प्रसिद्ध खयाल गायक म्हणून ओळखले जाऊ लागले. बीजापूर, पुणे आणि ग्वालियर या शहरांमध्ये राहिले. त्यांनी ग्वालियरचे ‘उस्ताद हाफिज अली खान’ यांच्याकडूनही शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले; पण त्यांनी शास्त्रीय संगीतातले सुरुवातीचे प्रशिक्षण अब्दुल करीम खान यांचे शिष्य ‘पंडित रामभाऊ कुंदगोळकर’ यांच्याकडून घेतले होते.
एम. एस. सुब्बुलक्ष्मी
मदुराई षण्मुखवादिवु सब्बुलक्ष्मी या मदुराई, तामिळनाडू येथील भारतीय कर्नाटक गायिका होत्या. ‘भारतरत्न’ या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या संगीतकार होत्या. १९७४ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय संगीतकार असून दक्षिण भारताच्या कर्नाटक परंपरेतील शास्त्रीय आणि अर्ध-शास्त्रीय गाण्यांचे अग्रगण्य सूत्रधार म्हणून अचूक शुद्धवाद्यांनी श्रीमती एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांना मान्यता दिली आहे.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले
हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची कारकीर्द १९४३ मध्ये सुरू झाली. त्यानंतर ७ दशकांहून अधिक काळ त्यांना भारतीय संगीतात योगदान दिले आहे. चित्रपट संगीत, पॉप, गजल, भजन, भारतीय शास्त्रीय संगीत, कव्वाली, अंगाईगीत…अशी विविध प्रकारच्या गाण्यांना त्यांनी आवाज दिला आहे. याशिवाय मराठी, आसामी, हिंदी, उर्दू, तेलगू, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, इंग्रजी, रशियन…अशी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत.
मोहम्मद रफी
भारतीय चित्रपटसृष्टीतले पार्श्वगायक महम्मद रफी. हे प्रतिभावंत गायकांपैकी एक मानले जातात. देशभक्तीपर, उडत्या चालीची, कव्वाली, गझल, भजन, शास्त्रीय, रोमॅंटिक…अशी विविध बाजाची गाणी त्यांनी गायली आहेत. जुन्या पिढीतील ते प्रसिद्ध गायक होते. रफी किंवा रफी साहेब म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या आवाजातील गोडवा आणि समृद्ध गायनशैलीमुळे त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्याकडून अनेक गायकांना प्रेरणा मिळाली. सोनू निगम, मुहम्मद अझीझ, उदित नारायण…ही त्यापैकी काही नावे. १९४० ते १९८० सालापर्यंत त्यांनी ५००० गाणी गायली आहेत. गुरु दत्त, दिलीप कुमार, देव आनंद, भारत भूषण, जॉनी वॉकर, जॉय मुखर्जी, शम्मी कपूर, राजेंद्र कुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र, ऋषी कपूर, मिथुन चक्रवर्ती आणि किशोर कुमार या कलाकारांवर त्यांची गाणी चित्रित करण्यात आली होती.
सुमन कल्याणपूर
ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर. हिंदी, मराठी, बंगाली, असमिया, गुजराती, कन्नड, मैथिली, भोजपुरी, राजस्थानी, उडिया आणि पंजाबी याव्यतिरिक्तही अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांना चित्रकला आणि संगीत या विषयात रुची होती. त्यांनी मोहम्मद रफी, लता मंगेशकर, मुकेश, गीता दत्त, आशा भोसले, हेमंत कुमार, तलत महमूद, किशोर कुमार, मन्ना डे, महेंद्र कपूर आणि शमशाद बेगम या हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक मानले जाते. त्यांनी एकूण 857 हिंदी गाणी गायली आहेत. त्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सर्वोच्च पदावर काम केले आहे. पुण्यातील प्रभात फिल्म्सचे संगीत दिग्दर्शक आणि जवळचे कौटुंबिक मित्र पंडित केशव राव भोसले यांच्याकडून शास्त्रीय गायन शिकण्यास सुरुवात केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला गायन हा त्यांचा केवळ छंद होता, परंतु हळूहळू संगीताची आवड वाढली आणि त्यांनी उस्ताद खान, अब्दुल रहमान खान आणि गुरूजी मास्टर नवरंग यांच्याकडून व्यावसायिक शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांना हिंदी चित्रपटातील सर्वोत्कृष्ट शास्त्रीय गाण्यासाठी 3 वेळा प्रतिष्ठित सूर श्रृंगार सन्मान पुरस्कार, महाराष्ट्र सरकारकडून लता मंगेशकर पुरस्कार, 2009 साली गदीमा फाउंडेशनकडून गदीमा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
कुमार सानू
कुमार सानू यांनी बॉलिवूडची हजारो हिंदी गाणी गायली आहेत. हिंदीव्यतिरिक्त मराठी, नेपाळी, आसामी, भोजपुरी, गुजराती, मणिपुरी, तेलगु, मल्याळम, कन्नड, तमिळ, पंजाबी, ओडिया, छत्तीसगढी, उर्दू, पाली, इंग्रजी आणि त्यांची मूळ बंगालीमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत.
अलका याज्ञिक
अलका याज्ञिक यांचे बॉलिवूड संगीत क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आहे. 1981 मध्ये ‘लावारिस’ मधील ‘मेरे अंगने में’ या सुपरहिट गाण्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर, त्यांना पुढच्या बॉलिवूड गाण्यासाठी 1988 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती. त्यानंतर ब्लॉकबस्टर चित्रपट ‘तेजाब’ मधील ‘एक दो तीन’ या गाण्याने तिला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. 25 विविध भाषा आणि 15 पाकिस्तानी गाणी त्यांनी गायली आहेत. तिने अनु मलिक, नदीम-श्रवण आणि ए. आर. रहमान यासारख्या दिग्गज संगीतकारांसोबत काम केले आहे. समर्पण, प्रतिभाशैली आणि कलेप्रती असलेली श्रद्धा यामुळे अलका यामुळे त्यांनी गायन क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.
श्रेया घोषाल
श्रेया घोषालने संजय लीला भन्सालीच्या ‘देवदास’ या ऐतिहासिक रोमँटिक चित्रपटात ‘सिलसिला ये चाहत का’ हे गाणे सादर केल्यानंतर तिचे बॉलिवूड संगीतात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण झाले. बॉलीवूडच्या इतर अनेक गायकांप्रमाणेच, सा रे गा मा पा-चिल्ड्रन्स स्पेशल एपिसोड या रिअॅलिटी शोमधून श्रेयाने तिच्या करियरची सुरुवात केली. ‘धीरे जालना’ असो किंवा ‘परम सुंदरी’ या गाण्यांमुळे तिने तिचा वेगळा ठसा उमटवला आहे. तिचा तरल, मुलायम आणि भावुक आवाज श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा आहे.
सुनिधी चौहान
‘बालकलाकार’ म्हणून तिने आपल्या गाण्यातील करियरला वयाच्या चौथ्या वर्षापासून सुरुवात केली. ‘मेरी आवाज सुनो ” या रिअॅलिटी शोमध्ये यश मिळाल्यानंतर सुनिधीने ‘मस्त’ या चित्रपटासाठी ‘रुकी रुकी सी जिंदगी’ हे तिचे पहिले पार्श्वगायन ध्वनिमुद्रित केले. सुनिधीने गौतम मुखर्जीकडून गायन प्रशिक्षण घेण्यापूर्वी काही तिची काही गाणी ध्वनिमुद्रित झाली होती. त्यानंतर, फिझामध्ये ‘मेहबूब मेरे’, मिशन काश्मीरमध्ये ‘भुमरो’, कांटेमध्ये ‘माही वे’ ही तिची गाणी प्रसिद्ध झाली. सुनिधिने मराठी, कन्नड़, तमिल, तेलुगु, बंगाली, असमिया और गुजराती चित्रपटांकरिता २०००हून अधिक गाणी गायली आहेत. टीव्ही मालिका मेरी आवाज़ सुनो या गाण्यामुळे तिला पार्श्वगायनाकरिता संधी मिळाली. तिला आतापर्यंत दोन स्टार स्क्रीन पुरस्कार, दोन आयफा पुरस्कार आणि एक झी पुरस्कार मिळाला आहे.