झोपडपट्टीत तयार होतात कोरोना टेस्ट किट! एफडीएचा छापा! 

छापेमारीच्या वेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या किट ह्या बनावट कंपनीच्या असून त्यावर कोणताही बॅच नंबर किंवा एक्सपायरी डेट देण्यात आली नव्हती.  

138

उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीतील झोपडपट्टीत आरटीपीसीआर चाचणीचे किट बनवली जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्यावर, गुरुवार, ६ एप्रिल रोजी अन्न आणि औषध प्रशासन, उल्हासनगर महापालिका आणि पोलिस यांनी संयुक्तरित्या खेमानी झोपडपट्टीत धाड टाकली आणि काही जणांना ताब्यात घेतले. ही किट बनवणारी लहान मुले मास्क न लावता आणि हॅन्डग्लोज न घालता हे किट बनावत होते.

कंत्राटदार केशवानी विरोधात गुन्हा दाखल!

यावेळी हे किट बनवणाऱ्या मुलांनी ‘कंत्राटदार मनीष केशवानी यांनी हे काम आम्हाला दिले असून याचा उपयोग कशासाठी होतो, याबाबत आम्ही अनभिद्न्य आहोत’, असे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी केशवानी याच्याविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. आदल्या रात्री केशवानी याने या ठिकाणाहून मोठ्या संख्येने किट घेतल्या ताब्यात घेतल्या.

(हेही वाचा : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी विक्रम भावेंना जामीन मंजूर!)

बनावट कंपनीच्या नावाने तयार होते किट!

छापेमारीच्या वेळी पोलिसांना काही किटच्या पाकिटांवर Bio Swab असे लिहिण्यात आल्याचे आढळून आले. एफडीएकडे अशा नावाच्या कोणत्याही कंपनीची नोंदणी नाही. या किटवर कोणताही बॅच नंबर किंवा एक्सपायरी डेट देण्यात आली नाही. पोलिस आता केशवानीची चौकशी करत आहेत. हे किट कोणत्या कंपनीसाठी बनवले जात होते आणि कुठे पाठवले जात होते, याची माहिती पोलिस घेणार आहेत. अशा प्रकारे जर कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन न करता कोरोना टेस्ट किट झोपडपट्ट्यांमधून बनवले जात असेल, तर हे लोकांच्या जिवाशी खेळ खेळण्यासारखे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.