बुधवारी, ५ एप्रिल रोजी अचानक उसळी घेतलेली कोरोना रुग्णांची संख्या गुरुवारी पुन्हा घटलेली पाहायला मिळाली आहे. बुधवारी जिथे दिवसभरत ३,८७९ रुग्ण आढळून आले होते आणि ७७ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे गुरुवारी, ३ हजार ५६ रुग्ण आणि ६९ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर कमी जास्त होत असल्याने मुंबईकरांना स्वत:ची काळजी अगदी काटेकोरपणे घ्यावी लागणार आहे.
रुग्ण दुपटीचा दर १३० दिवसांवर!
मागील तीन दिवसांमध्ये अडीच हजारांच्या आसपास असणारी रुग्ण संख्या पावणे चार हजारांच्या आसपास जावून पोहोचली. त्यामुळे पुन्हा ही संख्या वाढते की काय असे वाटत असतानाच गुरुवारी हा आकडा कमी होवून ३,०५६ एवढे रुग्ण आढळून आले. मात्र, गुरुवारी दिवसभर एकूण ३ हजार ८३८ रुग्ण बरे होवून घरी परतले. मात्र, गुरुवारपर्यंत ५०,६०६ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु होते. तर पुन्हा एकदा चाचण्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. बुधवारी दिवसभरात जिथे ३५ हजार ३७७ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या, तुलनेत गुरुवारी ३० हजार ९४२ चाचण्या करण्यात आल्या आहे. तर दिवसभरात ६९ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये १८ रुग्ण हे दीर्घकालीन आजारी होते. तर यामध्ये ४२ पुरुष व २७ महिला रुग्णांचा समावेश होता. यातील ३ रुग्ण हे ४० वयोगटाच्या खालील आहेत. तर ४५ रुग्णांचे वय हे ६० वर्षांवरील होते. आणि ४० ते ६० वयोगटातील मृतांचा आकडा हा २१ एवढा होता. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर बुधवारी जो १२३ दिवसांवर आला होता, तो १३० दिवसांवर आला आहे.
(हेही वाचा : तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या संसर्गावर काय उपाययोजना केली? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल )
मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या निम्म्यावर!
एकेवेळी मुंबईतील सील इमारती आणि मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या १२०० वर पोहोचली होती, तिथे ही संख्या आता निम्म्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारपर्यंत संपूर्ण मुंबईत ६४५ सील इमारती आणि मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या होती, तर कंटेन्मेंट झोन झालेल्या झोपडपट्टींची संख्या ९६ एवढी होती.