मोदी सरकारने यंदा ५ मान्यवरांना भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna) घोषित केला आहे. निवडणुकीच्या वर्षात एकापाठोपाठ एक पाच व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. यातून मोदी सरकारने विविध राज्यांतील अनेक समीकरणे सोडवल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. या व्यक्तिमत्त्वांच्या माध्यमातून भाजपने कशी आणि कोणती समीकरणे सोडवली, ते जाणून घेऊया ?
(हेही वाचा – Bharat Ratna : १५ दिवसांत ५ भारतरत्न जाहीर; काय आहेत नियम ?)
माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग
चौधरी चरणसिंग (Chaudhary Charan Singh) हे शेतकऱ्यांचे तारणहार म्हणून ओळखले जात आहेत. चरणसिंग यांना भारतरत्न दिल्याचा परिणाम पुढील लोकसभा निवडणुकीत पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीतील जाटबहुल जागांवर होऊ शकतो. या भागांमध्ये लोकसभेच्या सुमारे 40 जागा असून, तेथे जाट मतदारांचा प्रभाव असल्याचे मानले जाते.
चौधरी चरणसिंग यांचे नातू आणि राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. चरणसिंग यांना भारतरत्न दिल्यानंतर जयंत यांनी ट्विट केले, ‘मन जिंकले.’ जयंत चौधरी भाजपसोबत गेल्यास पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फायदा होऊ शकतो.
माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव
पंतप्रधान मोदी नेहमीच पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करतात आणि काँग्रेसच्या माजी पंतप्रधानांबद्दलची त्यांची वृत्ती गंभीर असल्याचा आरोप विरोधकांनी सुरु ठेवला. एका दिवसापूर्वी पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे कौतुक केले होते. ते व्हीलचेअरवर बसूनही सभागृहात येत राहिले आणि लोकशाहीला बळ देत असल्याचे म्हटले होते. दुसऱ्याच दिवशी नरसिंह राव (PV Narasimha Rao) यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली. नरसिंह राव यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा ही विरोधकांना चोख प्रत्युत्तर आहे. काँग्रेसने पंतप्रधान म्हणून राव यांच्या योगदानाकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याचा आरोप भाजप सातत्याने करत आहे. मोदींचे कट्टर टीकाकार मणिशंकर अय्यर यांनीही एकदा राव यांना भाजपचे पहिले पंतप्रधान म्हटले होते.
कृषीक्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन
शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी मिळवलेले यश अतुलनीय आहे. या शिवाय त्यांचे व्यक्तिमत्त्व दक्षिण भारतातील प्रतिभावंतांचेही प्रतिनिधीत्व करत आहे. स्वामीनाथन (MS Swaminathan) यांना मरणोत्तर भारतरत्न दिल्याने दक्षिणेला आकर्षित करण्याच्या मोदी सरकारच्या रणनीतीला आणखी बळ मिळू शकते. स्वामीनाथन हे कृषी क्रांतीचे जनक होते. त्यांना भारतरत्न देऊन दक्षिणेला, तसेच शेतकऱ्यांना आकर्षित करण्याची भाजपची रणनीती म्हणून पाहिले जात आहे.
(हेही वाचा – Maharashtra Security Force : राज्यात सुरक्षितता वाढवण्यासाठी ‘महाराष्ट्र सुरक्षा दल’करत असलेलं कार्य, जाणून घ्या…)
माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी
लालकृष्ण अडवाणी (LK Advani) हे भाजपचे एक मजबूत नेते आणि राममंदिर आंदोलनाचा मोठा चेहरा आहेत. 22 जानेवारीला राममंदिराच्या अभिषेकानंतर अडवाणींना भारतरत्न देऊन भाजपने मतदारांना संदेश दिला. मंदिर आंदोलनातील एक मोठा चेहरा अडवाणी यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप भाजपवर होत आहे. मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली, तेव्हाही विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर अवघ्या 10 दिवसांत भाजपने अडवाणींना भारतरत्न देऊन विरोधकांकडून हा मुद्दा हिसकावून घेतला. या सोबतच आपल्या ज्येष्ठ नेत्यांचा आपण किती आदर करतो, असा संदेशही त्यांनी आपल्या पारंपरिक मतदारांना दिला.
बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर
यावर्षी सर्वप्रथम जननायक कर्पुरी ठाकूर (Karpuri Thakur) यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली. बिहारचे माजी मुख्यमंत्री सामाजिक न्यायाचे नायक होते. केंद्राचे हे पाऊल आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत करू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. बिहारमध्ये मागास आणि 36 टक्के अत्यंत मागासवर्गियांचा वाटा 27 टक्के आहे. कर्पूरी ठाकूर यांचा एकूण 63 टक्के समाजावर मोठा प्रभाव आहे. हा वर्ग त्यांना आपला नायक म्हणून पाहतो.
कर्पूरी ठाकूर यांचा मुलगा रामनाथ ठाकूर हे जेडीयूचे राज्यसभा खासदार आहेत. कर्पूरी यांना भारतरत्न मिळाल्यानंतर अवघ्या ८ दिवसांनी भाजप आणि जेडीयू पुन्हा एकदा एकत्र आले. चिराग पासवान, पशुपती कुमार आणि जीतनराम मांझी हे पक्ष आधीच एनडीएचे भागीदार होते. अशा स्थितीत नव्या राजकीय समीकरणांच्या आधारे भाजप बिहारमध्ये स्वत:ला बलाढ्य मानत आहे. कर्पुरी यांना भारतरत्न देऊन भाजपने बिहारचे राजकीय समीकरण सोडविण्याचे काम केल्याचे बोलले जात आहे. आता आगामी निवडणुकीत राज्यातील सर्व 40 लोकसभेच्या जागा जिंकण्याचा दावा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सुरू केला आहे. (Bharat Ratna)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community