छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अर्थात शिवाजी पार्कमधील पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी वाहिन्या टाकणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, मैदानाचा समतल राखणे तसेच पुरातन वारसा असलेल्या प्याऊंचे पुनर्बांधणी आदींच्या माध्यमातून नूतनीकरणाच्या कामाला मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यातील स्थायी समितीची मंजुरी मिळाली. त्यानंतर ३ मे रोजी या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. कंत्राटदाराने श्रीफळ वाढवून कामाला सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्याहस्ते याचे भूमिपूजन करण्यात आले. विशेष म्हणजे शिवाजी पार्कच्या सुशोभिकरणाच्या भूमिपूजनातही सभागृह नेत्यांनी महापौरांना बाजुलाच ठेवल्याचे पहायला मिळाले. आधी शिवाजी पार्कमधून महापौरांचे निवासस्थान काढून घेण्यात आले आणि आता त्याच परिसरात महापौरांना कोणतेही स्थान दिली जात नसल्याचे दिसून येत आहे.
३ कोटी ३७ लाख रुपयांचे कंत्राट दिले!
दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान तथा पार्कमध्ये धुळीच्या प्रदुषणामुळे स्थानिक रहिवाशांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. तसेच शिवाजी महाराज पार्क हे उंच सखल असल्यामुळे पावसाळ्यात तिथे पाणी साचते व खेळाडूंना विविध खेळ खेळण्याकरता अडचणी येतात. तसेच या पार्कमध्ये अस्तित्वात असलेले पुरातन वास्तू वारसा असलेली प्याऊ जीर्ण अवस्थेत आहे. या सर्व स्थितीवर मात करून या पार्काचे नूतनीकरण करण्याचा निर्णय जी-उत्तर विभागाने घेतला आहे. हे काम पावसाळा वगळता पुढील सहा महिन्यांमध्ये करणे आवश्यक असेल. यासाठी दिपेश कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी विविध करांसह ३ कोटी ३७ लाख रुपयांचे कंत्राट दिले असून याला २८ मार्च रोजी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या या कामाचे भूमिपूजन ४ मे रोजी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्याहस्ते पार पडले. यावेळी सभागृहनेत्या विशाखा राऊत आणि आमदार सदा सरवणकर यांच्याहस्तेही श्रीफळ वाढवण्यात आले.
(हेही वाचा : लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नवदाम्पत्य ‘ऑन फिल्ड’)
सुशोभिकरणाचे काम ३ मे ला सुरु!
विशेष म्हणजे गाजावाजा न करता प्रशासनाने हे काम ३ मेलाच सुरु केले होते. नाना-नानी पार्कच्या मागील बाजूला रेन वॉटर हार्वेस्टिंग करता विहिर खोदकामाला सुरुवात केली होती. नाना-नानी पार्क पाठोपाठ आता स्काऊट अँड गाईड हॉल व समर्थ व्यायामशाळा आदी ठिकाणी अशा प्रकारच्या रिंगवेलचे काम केले जाणार आहे. परंतु ज्या कामाला एक दिवस आधीच सुरुवात केलेली शिवाजी पार्कमधील जनतेने याची देही याची डोळा पाहून समाधान व्यक्त केले, त्याच कामाचे श्रेय घेण्यासाठी शिवसेनेने एक दिवस उशिरा भूमिपूजन अगदी साधेपणाने करण्याचा प्रयत्न केला. सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी कोहिनूर स्क्वेअरच्या वाहनतळाच्या जागेतील ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राच्या उद्घाटनात महापौरांना बाजुला सारले होते, त्यानंतर याचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रकल्पाच्या भूमिपूजनात लांब ठेवल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community