संतोष वाघ
शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने मॉरीस नोरोन्हा याचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला सायंकाळी उशिरा अटक केली आहे. (BORIVALI FIRING EXCLUSIVE) मेहुल पारेख आणि रोहित साहू या दोघांची चौकशी सुरू आहे. मॉरीस (Mauris Noronha) याने अभिषेक यांच्या हत्येचा कट दोन महिन्यांपूर्वी रचला होता. दोन महिन्यापूर्वीच अमरेंद्र मिश्रा याला कामावर ठेवून या हत्येसाठी मॉरीस नोरोन्हा याने मिश्रा याचा परवाना असलेले पिस्तूल वापरले, अशी माहिती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली आहे.
मुंबई हादरवून सोडणाऱ्या बोरिवली येथील गोळीबाराचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ११ सह गुन्हे शाखेच्या सर्व कक्ष प्रमुखांना या गुन्ह्याच्या तपासकामी बोलविण्यात आले आहे. गुन्हे शाखेने या गोळीबार प्रकरणी शुक्रवारी मॉरीस नोरोन्हा याचे सहकारी मेहुल पारेख, रोहित साहू आणि अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला ताब्यात घेण्यात आले होते. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिस्तुल अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याचे होते.
दोन महिन्यांपूर्वी शिजला कट….
२०२२ मध्ये मॉरीस नोरोन्हा याच्यावर दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात अभिषेक घोसाळकर याने अडकविल्याचा संशय मॉरीस याला होता. या गुन्ह्यात मॉरीसला तीन महिने तुरुंगात काढावे लागले होते, तेव्हापासून मॉरीस याच्या मनात अभिषेकबद्दल मनात राग होता. मॉरीसवर मुंबईत दाखल असलेल्या गुन्ह्यामुळे परदेशात जाता येत नव्हते. या सर्व प्रकारामुळे मॉरीसला नैराश्य आले होते, या सर्व परिस्थितीला अभिषेक हा जबाबदार असल्यामुळे मॉरीस याने अभिषेक घोसाळकर याच्या हत्येचा कट दोन महिन्यांपूर्वीच रचला होता. अभिषेकच्या हत्येसाठी त्याला पिस्तुल हवे होते, यासाठी त्याने अमरेंद्र मिश्रा याला अंगरक्षक म्हणून कामाला ठेवले होते. कामाला ठेवण्यापूर्वी मॉरीसने मिश्राला अट घातली होती, ती अट अशी होती की, घरी जाताना त्यांच्याजवळील परवाना असलेली पिस्तुल ऑफिसमध्ये ठेवून जायचे, कामाची गरज असल्यामुळे त्याने अट मान्य केली, अशी माहिती मिश्रा याच्या पत्नीने एका वृत्तवहिनीशी बोलतांना सांगितले.
घटनेच्या दिवशी मिश्राला पारेख सोबत हॉस्पिटलला पाठवले….
अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) याच्या हत्येसाठी मॉरीसने गुरुवार निवडला होता. गुरुवारी मॉरीसने त्याच्या बोरिवली आयसी कॉलनी येथील कार्यालयात गरीब महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी त्याने अभिषेक घोसाळकर याला आमंत्रित केले होते. त्या दिवशी सायंकाळी मॉरीस याने अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा (Amarendra Mishra) याला मेहुल पारेख याची आई करुणा रुग्णालयात ऍडमिट असून पारेख सोबत त्याला जाण्यास सांगितले. जाण्यापूर्वी त्याने मिश्राला पिस्तुल कार्यालयात ठेवून जाण्यास सांगितले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community