Political parties in the state : राज्यातील राजकारण नव्या दिशेने!

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ऊबाठा ज्या महाविकास आघाडीचा भाग आहे त्या आघाडीत मनसे जाईल, असे मत राजकारणापलिकडे विचार करणारा मराठी माणूसच मांडू शकतो.

303
State Politics : राज्यातील राजकारण नव्या दिशेने!
State Politics : राज्यातील राजकारण नव्या दिशेने!
  • सुजित महामुलकर

‘शत्रूचा शत्रू, आपला मित्र’ या चाणक्यानितीप्रमाणे राज्यातील राजकीय (Political parties in the state) पक्ष येत्या लोकसभा निवडणुकीसाठी एकमेकांशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र सध्या राजकारणात दिसत आहे. मात्र याचा त्यांना किती लाभ होईल हे पुढील दोन महिन्यांत लक्षात येईल आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पुढची रणनीती निश्चित होईल. राज्यात वंचित बहुजन आघाडीने नुकतेच महाविकास आघाडीशी जुळवून घेण्याची तयारी दर्शवली तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नेत्यांनी भाजप-सेना नेत्यांच्या गाठी-भेटी सुरू केल्या.

जुळवून घेतले
वंचित बहुजन आघाडीने गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसला मोठा धक्का दिला. प्रकाश आंबेडकर यांचे आणि कॉँग्रेस तसेच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस, पूर्वीचा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष यांच्याशी विळ्या भोपाळ्याचे वैर. आंबेडकर यांनी अनेकदा कॉँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. कॉँग्रेसच्या अनेकांनी वंचितला भाजपची बी-टीम म्हणून यापूर्वी हिणवलेदेखील. पण भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी, राजकीय शत्रू काँग्रेस आणि शरद पवार यांच्याशी असलेले वैर विसरुन, एकमेकांशी जुळवून घेत वंचितने महाविकास आघाडीत स्थान मिळवले. कॉँग्रेसनेही थोडं उशिरा पण वंचितला सोबत घेतले. ही संधीसाधू मैत्री किती काळ टिकते, हे पुढील दोन महिन्यांत स्पष्ट होईलच.

पक्षाची धोरणे, पक्षाचा जाहीरनामा
येत्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याकडे राजकीय पक्षांची वाटचाल दिसू लागली आहे. मुळात लोकसभा निवडणुकीत मतदार विधानसभेपेक्षा वेगळा विचार करून मतदान करतात. देशपातळीवर कोणता पक्ष स्थिर सरकार देऊ शकेल अशा पक्षांना प्राधान्य देण्याकडे मतदारांचा कल दिसतो. एका मतदार संघात सरासरी १५ लाखाच्या वर मतदार असल्याने उमेदवार हा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे पक्षाची धोरणे, पक्षाचा जाहीरनामा आणि मग उमेदवार असा साधारण विचार करून मतदान केले जाते, असा सर्वसाधारण समज आहे.

मनसे-भाजप-शिवसेना युती?
अशा परिस्थितीत नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते बाळा नांदगांवकर, माजी आमदार नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनी राज्यातील भाजपचे प्रभावी नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तसेच शिवसेनेचे प्रमुख नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अर्धा-पाऊण तास चर्चा केली. देशपांडे यांनी कुठलेही आढे-वेढे न घेता ही भेट झाल्याचे माध्यमांवर मान्य केले. अर्थात, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच ही नेते मंडळी भाजप शिवसेना नेत्यांच्या भेटीला गेली, हे उघड आहे.

दिशाच बदलून जाईल
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ऊबाठा ज्या महाविकास आघाडीचा भाग आहे त्या आघाडीत मनसे जाईल, असे मत राजकारणापलिकडे विचार करणारा मराठी माणूसच मांडू शकतो. खरंतर आजही दोन्ही ठाकरे एकत्र यावे, किंबहुना एकत्र आले तर राज्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळेल. राजकारणाची दिशाच बदलून जाईल. पण याची १ टक्काही शक्यता नाही. त्यामुळेच मनसे आणि भाजप-शिवसेना भेट हा महायुतीसाठी मैत्रीचा हात होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. राज्यात लोकसभेला उमेदवार निवडून येईल इतकी ताकद मनसेची नसली तरी मुंबई, पुणे, नाशिक, रायगड अशा विभागीय क्षेत्रात काही प्रमाणात ती दिसून येते. लोकसभेसाठी थेट आणि उघडपणे महायुतीत न जाता काही ठराविक जागांवर छूपी यूती करण्याचे ठरले तरी त्यातून दोघांना राजकीय लाभ होऊ शकतो. तसेच आता ‘रोपटे’ लावून पुढील सहा महिन्यांनी, विधानसभेचे ‘फळ’ चाखायचे ठरले तर त्यात काही गैर नाही.

हिंदुत्वाचा नारा
संदीप देशपांडे यांनी ही भेट सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. सध्या मनसेचा केवळ एक आमदार असला तरी ठाकरे या नावाला आजही वलय आहे. अनेकांना भाषणात राज आणि बाळासाहेबांमधील साम्य, ती छबी दिसते. आजही समाजमाध्यमे थेट प्रक्षेपण दाखवत असतानाही त्यांच्या सभा गर्दी खेचतात. राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी हिंदुत्वाचा नारा दिला. आज देशभर रामलला आणि भक्तिमय वातावरणात हिंदुत्व पुढे नेणाऱ्या पक्षाला, नेत्याला मतदार निश्चितच प्रतिसाद देतील,  यावर विश्वास ठेवायला हरकत नसावी.

भाजप नेते, पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनीही राज ठाकरे यांनी महायुतीला साथ दिली तर त्यात गैर काही नाही, असे मत व्यक्त केले. पण हे बोलत असताना त्यांची देहबोली ‘आनंदच होईल’ असा संदेश देत होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.