ठाकरेंनी कोकणाला वाऱ्यावर सोडले?

ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरुन दिले, त्या कोकणाचा विसर आता सत्ताधारी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांना पडला का, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

132

शिवसेना आणि कोकणाचे एक घनिष्ठ नाते आहे. खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी देखील अनेकदा आपल्या भाषणात कोकणी माणसाने आपल्याला भरभरुन प्रेम दिल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कोकण आणि शिवसेनेचे नाते आगळेवेगळे असल्याचे म्हटले आहे. पण आता ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरुन दिले, त्या कोकणाचा विसर आता सत्ताधारी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांना पडला का, असे म्हणण्याची वेळ आली आहे. होय तसेच म्हणावे लागेल. कारण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्ण वाढत असताना, ना मुख्यमंत्र्यांचे लक्ष ना त्यांच्या नेत्यांचे… असेच चित्र सध्या पहायला मिळत आहे. कोकणाचा आणि विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. एवढेच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजन अभावी रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे.

ना व्हेंटिलेटर, ना ऑक्सिजन बेड्स

सध्या कोकणात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असताना बेडची तसेच ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली आहे. गावागावांत कोरोना रुग्ण वाढू लागल्याने स्थानिक प्रशासनावर देखील भार पडत आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यात ३ हजार ६७५ सक्रीय रुग्ण आहेत. मात्र जिल्ह्यात फक्त १ हजार ९५ बेड्स उपलब्ध आहेत. जिल्हा रुग्णालय असो वा उपजिल्हा रुग्णालय, सगळीकडे बेड अभावी रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यात आरटी-पीसीआर रिपोर्ट यायला देखील उशिर लागत असल्याने, तसेच रॅपिड टेस्ट देखील बंद असल्याने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडली की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. एवढेच नाही तर जिल्ह्यात अजूनही प्लाझ्मा डोनेट मशिन देखील उपलब्ध नाही. हीच परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यात देखील पहायला मिळत आहे. विशेष बाब म्हणजे या जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षीत डॉक्टर देखील नसल्याची एक ओरड ऐकायला येत आहे.

(हेही वाचाः ग्रामीण भागात कोरोनाचे थैमान… वाढतोय मृतांचा आकडा)

दोन जिल्ह्यांत अशी आहे स्थिती

रत्नागिरी- आतापर्यंत २७ हजार ६७७ बाधित रुग्ण असून, त्यापैकी १९ हजार ३४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ५५५ जणांचा कोरोनामळे मृत्यू झाला. इतकेच नाही तर सध्या ७ हजार ७७२ इतके अॅक्टिव रुग्ण आहेत.

सिंधुदुर्ग- आतापर्यंत १५ हजार १६६ बाधित रुग्ण असून, त्यापैकी ११ हजार १०० जणांनी कोरोनावर मात केली. तर ३९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या ३ हजार ६७५ अॅक्टिव रुग्ण आहेत.

लसीकरणातही सावळा गोंधळ

एकीकडे जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्था पुरती कोलमडली असताना, दुसरीकडे लसीकरणाचा देखील सावळा गोंधळ पहायला मिळत आहे. लस घेण्यासाठी लोकांना २० ते २५ किलोमीटर जावे लागत असून, दिवसाला फक्त १०० डोसच लस एका केंद्रावर दिली जाते. त्यामुळे अनेकदा इतका प्रवास करुन देखील लोकांना लस घेण्यावाचून परतावे लागते. अजून ४५ वर्षांवरील लोकांनाच पहिला डोस मिळाला नसल्याने, जिल्ह्यात लसीकरण कसे पूर्ण होणार हा कळीचा मुद्दा बनत चालला आहे. विरोधक देखील लसीकरणावरुन सत्ताधाऱ्यांना घेरताना दिसत आहेत.

गावचे तरुणच घेत आहेत पुढाकार

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या ऑक्सिजन अभावी रुग्णांचा जीव जात असताना, आता गावातील तरुणच पुढाकार घेत असल्याचे पहायला मिळत आहे. काही गावांमध्ये काही होतकरू तरुणांनी स्वखर्चाने ऑक्सिजन बॅकपॅकची मशीन देखील विकत घेतली असून, आता लसीकरणासाठी देखील पुढाकार हे तरुण घेत आहेत. मात्र आता या तरुणांना स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची देखील मदत मिळणे तितकेच गरजेचे आहे.

(हेही वाचाः राज्यातील 11 जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या होतेय कमी)

आमदार-खासदार काय कामाचे?

सध्या कोकणात सावंतवाडी, कुडाळ-मालवण, राजापूर, रत्नागिरी आणि गुहागर या पाच मतदारसंघांत शिवसेनेचे आमदार आहेत, तर एक खासदार आहेत. एकूण पाच आमदार आणि एक खासदार कोकणी जनेतने शिवसेनेच्या पदरात टाकले. तरी देखील या दोन्ही जिल्ह्यांची ही परिस्थिती असेल, तर हे आमदार-खासदार काय कामाचे? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

या मंत्र्यांनी कोकणाला वाळीत टाकले- राणे

कोकणाच्या या परिस्थितीवर माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी शिवसेनेवर राणे स्टाईलमध्ये प्रहार केला. आज कोकणातील या दोन्ही जिल्ह्यांना वाळीत टाकण्याचे काम कोणी केले असेल, तर शिवसेनेच्या या मंत्र्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी. आज अधिकाऱ्यांना कळतच नाही की, नेमके सरकारमध्ये काय सुरू आहे. रोज यांचे निर्णय बदलत आहेत. कुठल्याही विषयाचा यांना अभ्यास नाही. आपल्या जिल्ह्यासाठी वजन वापरावे लागते. पण तसे वजन या नेत्यांचे नाही. एवढेच नाही तर आपल्या खासदारांना वॅक्सिन म्हणजे काय हे देखील कळणार नाही. आज जे जिल्ह्याला खेचून आणले पाहिजे ते होताना दिसत नाही. आरोग्य व्यवस्था ढासळली आहे, असा प्रहारच निलेश राणे यांनी केला आहे.

गावागावांमध्ये सध्या लसीकरण शक्य नाही. आम्ही सध्या तालुकानिहाय लसीकरण करत आहोत. लसींचा तुटवडा असल्याने गावागावांत लस पाठवता येत नाही. जर लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली, तर गावागावांत लसीकरण करता येईल.

-विनायक राऊत, शिवसेना खासदार

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.