१२ रुग्णालयांत १६ ऑक्सिजन प्लांट : निविदेत नाही तेवढा छाननीत जातोय वेळ!

नियोजित वेळेत ऑक्सिजन प्लांट तयार न झाल्यास त्याचा फायदा रुग्णांना होवू शकणार नाही. तरीही महापालिकेचे अधिकारी याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

154

मुंबई महापालिका प्रशासनाने १२ रुग्णालयांमध्ये मिळून १६ प्राणवायू निर्मित प्रकल्प अर्थात ऑक्सिजन प्लांट राबवण्याचा निर्णय घेत तातडीने निविदा मागवल्या. या ऑक्सिजन प्लांटचे काम जलदगतीने करण्यासाठी लघु निविदा अर्थात शॉर्ट निविदा मागवल्या. परंतु जेवढा वेळ निविदा काढण्यात गेला, तेवढ्यापेक्षा अधिक वेळ हा छाननी करण्यात जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकीकडे मिशन ऑक्सिजनची स्वप्ने रंगवत आहे, तर दुसरीकडे महापालिकेचे अधिकारी याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. हा प्रकल्प जलदगतीने हाती घेण्याची गरज असताना महापालिकेचे अधिकारी निविदा छाननीच्या नावावर अडवून बसले आहेत. परिणामी हा ऑक्सिजन प्लांट उभारायला आणि प्रत्यक्षात रुग्णांच्या उपयोगात आणायला तेवढाच विलंब होण्याची भीती वर्तवली जात आहे.

अंदाजे ९० कोटी रुपये खर्च अपेक्षित!

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने प्राणवायू उपलब्‍धतेबाबत कायमस्‍वरुपी उपाययोजना म्‍हणून एकूण १२ रुग्‍णालयांमध्‍ये मिळून १६ प्राणवायू निर्मिती प्रकल्‍प (प्‍लांट) उभारण्‍याचे निश्चित केले आहे. यामध्‍ये वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्माण करुन तो रुग्‍णांना पुरवण्‍यात येईल. या सर्व १६ प्रकल्‍पांतून मिळून प्रतिदिन एकूण ४३ मेट्रिक टन प्राणवायू साठा निर्माण होणार आहे. मुंबई महानगरपालिकेने दोन वर्षांपूर्वी कस्तुरबा रुग्णालयात प्रतिदिन सुमारे ५०० घनमीटर (क्‍युबिक मीटर) क्षमतेचा प्राणवायू निर्मिती प्रकल्‍प उभारला आहे. तर जोगेश्‍वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयामध्ये देखील वर्षभरापूर्वी प्रतिदिन १ हजार ७४० घनमीटर (क्‍युबिक मीटर) क्षमतेचा प्रकल्‍प उभारला आहे. याच धर्तीवर हे प्रकल्प उभारले जात असून यासाठी या १६ प्रकल्‍पांचा एकूण खर्च अंदाजे ९० कोटी रुपये इतका अपेक्षित आहे.

(हेही वाचा : महापालिकेच्या ओळखपत्राची रिबीन अमॅझॉनवर विक्रीला! प्रशासनाची नोटीस)

दोन दिवसांमध्ये छाननी होईल!

यासाठी २४ एप्रिल २०२१ निविदा मागवण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी जाहीर केले. हे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी लघू निविदा अर्थात शॉर्ट टेंडर काढण्यात आले होते. त्यामुळे आधी तीन दिवसांकरता निविदा मागवण्यात आले होत्या. परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने चार दिवस वाढवून देत सात दिवसांचा कालावधी करण्यात आला. परंतु त्यानंतर दोन दिवसांमध्ये निविदांची छाननी करणे आवश्यक होते. परंतु मे महिन्यातील सात तारीख उलटली तरी निविदांची छाननीच सुरु आहे. त्यामुळे निविदा कालावधी जेवढा नव्हता, त्यापेक्षा अधिक कालावधी छाननी करण्यास लागलेला असून नक्की महापालिकेचे अधिकारी कुठली छाननी करतात याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांचे दोन पाकिटे उघडण्यात आली असून दोन दिवसांमध्ये ते अंतिम केले जातील, असे सांगितले.

…तर प्लांटचा फायदा रुग्णांना होणार नाही!

एका बाजुला ऑक्सिजन प्लांटची गरज लक्षात घेवून त्यासाठी निविदा मागवल्या जातात. दुसरीकडे यातील पात्र कंपनीची निवड करून त्याद्वारे लवकरात लवकर ऑक्सिजन प्लांट उभारण्याची कार्यवाही सुरु होणे आवश्यक आहे. जुलै-ऑगस्टमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे जूनपासून पावसाचेही आगमन होणार आहे. त्यामुळे निविदेतच जर वेळ काढत बसले, तर याला विलंब होईल आणि प्रत्यक्षात नियोजित वेळेत ऑक्सिजन प्लांट तयार न झाल्यास त्याचा फायदा रुग्णांना होवू शकणार नाही. तरीही महापालिकेचे अधिकारी याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.