ज्याप्रकारे शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकणी निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही बाजूंकडील व्हीपमधील त्रुटी काढून दोन्ही व्हीप अवैध ठरवून कोणत्याही आमदाराला अपात्र केले नाही. परंतु पक्षाच्या घटनेतील त्रुटी ठळकपणे मांडून शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातून काढून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती दिले. आता ही प्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर (NCP) आधीच झाली आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह शरद पवार यांच्या हातून काढून ते अजित पवार यांच्या हाती सोपवले आहे. मात्र दोन्ही बाजूंकडून आमदार अपात्रतेची याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर गुरुवार, १५ फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर महत्वाचा निर्णय देणार आहेत.
विधिमंडळ पक्षादेशाचा (व्हीप) भंग केला आहे का? हे पाहणार
विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यावर काय निर्णय देणार आहेत, यावर आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) आमदार अपात्रतेप्रकरणी शिवसेना आमदार अपात्रत्याच्या निकालाचे निकष सध्या चर्चेत आहेत. यात प्रामुख्याने दहाव्या परिशिष्टानुसार आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी त्यांनी विधिमंडळ पक्षादेशाचा (व्हीप) भंग केला आहे का? हा मुद्दा प्रामुख्याने पाहिला जाईल. त्याचबरोबर आमदारांचे जाहीर वर्तन पक्षविरोधी आहे का? विरोधी पक्षाशी हातमिळवणी करणारे आहे का? या मुद्द्यांचाही समावेश राहुल नार्वेकर यांच्या निकालपत्रात होता. राष्ट्रवादीच्या (NCP) आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष नार्वेकर या विषयांचाही विचार करणार का, अशी शक्यता वर्तवली जात आहेत.
Join Our WhatsApp Community