मीना अलेक्झेंडर (Meena Alexander) हे इंग्रजी साहित्य क्षेत्रातलं प्रचंड मोठं नाव. अलेक्झांडर यांनी आपल्या कविता वाचनाचे कार्यक्रम केले आणि बघता बघता त्या खूपच प्रसिद्ध झाल्या. पोएट्री इंटरनॅशनल (लंडन), स्ट्रुगा पोएट्री इव्हनिंग्ज, पोएट्री आफ्रिका, कॅलाबॅश फेस्टिव्हल, हार्बर फ्रंट फेस्टिव्हल आणि साहित्य अकादमी असा विविध साहित्यिक मंचांवर त्यांनी आपल्या कविता सादर केल्या.
मीना अलेक्झेंडर यांचे मूळ नाव मेरी एलिझाबेथ अलेक्झांडर असे होते. त्यांचा जन्म १७ फेब्रुवारी १९५१ रोजी अलाहाबाद येथे केरळस्थित सीरियन ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्यांचं बालपण आजी-आजोबांकडे गेलं. आजी-आजोबांनीच त्यांना इंग्रजीचे धडे दिले. विशेष म्हणजे अगदी लहानपणापासूनच त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली होती. त्या मल्याळममध्ये कविता लिहायच्या. १३ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या कविता अरबीत अनुवादित झाल्या आणि स्थानिक वृत्तपत्रात छापूनही आल्या.
(हेही वाचा – CRIME: लैंगिक अत्याचार करणाऱ्या नौशाद शेखच्या अनधिकृत बांधकामावर फिरला बुलडोझर)
१५व्या वर्षी त्यांनी आपले मेरी हे नाव बदलून मीना असे नामकरण केले. मीना हे त्यांचे लाडाचे नाव होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे त्यांनी इंग्लंड येथून पीएचडी पूर्ण केली. १९व्या वर्षी नर्व्हस ब्रेकडाउनमुळे त्या लिहू-वाचू शकत नव्हत्या, मात्र २२व्या वर्षी त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
२०१३ मध्ये त्यांनी येल पॉलिटिकल युनियनला संबोधित केले. त्यांच्या भाषणाचा विषय होता. “कवितेचा उपयोग काय?” हे भाषण वर्ल्ड लिटरेचर टुडेमध्ये प्रकाशित करण्यात आले होते. १९९८ मध्ये त्या साहित्यासाठीच्या Neustadt आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी ज्युरी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी न्यूयॉर्कमधील सेंट जॉन द डिव्हाईनच्या कॅथेड्रलमध्ये अमेरिकन पोएट्स कॉर्नर, इलेक्टर म्हणूनही काम केले होते. २१ नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांचे निधन झाले. आजही त्यांचे नाव इंग्रजी साहित्य क्षेत्रात अतिशय आदराने घेतले जाते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community