टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी कॉक्स अँड किंग्जच्या मालकाकडून ९ कोटी रुपये खंडणी (Extortion) उकळल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी रोमी उर्फ हिरेन भगत विरुद्ध आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. १६४ कोटींच्या गुन्ह्यात आर्थर रोड तुरुंगात असलेल्या रोमी भगत याला गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन अटक केली आहे.
रोमी भगत आर्थर रोड तुरुंगात होता
मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ९ च्या पथकाने गेल्या महिन्यात रोमी भगतला १६४ कोटींच्या खंडणी (Extortion) प्रकरणात विमानतळ परिसरातून अटक केली होती, सध्या तो मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात होता. गुरुवारी वांद्रे पोलीस ठाण्यात भगत यांच्यावर दुसरा खंडणीचा गुन्हा झाला. ट्रॅव्हल्स कंपनी कॉक्स अँड किंग्जचे मालक पीटर केरकर यांच्यावर अनेक बँक फसवणूक प्रकरणांचा तपास सुरू आहे आणि गेल्या काही वर्षांत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांनी त्यांना अटक केली आहे आणि आरोपपत्र दाखल केले आहे. सूत्रांनी सांगितले की, भगत याने पीटर केरकरचे वडील अजित केरकर यांची भेट घेऊन स्वतःला ईडी अधिकारी असल्याचे सांगून पीटरची या गुन्ह्यातून बाहेर काढण्याचा नावाखाली ९ कोटी रुपयांची खंडणी (Extortion) घेतली होती.
किमान चार गुन्हे नोंदवले
या प्रकरणी रोमी भगत याच्यावर खंडणी, लोकसेवकाची तोतयागिरी करणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खार येथे राहणारा भगत याच्यावर सध्याच्या दोन खंडणीच्या गुन्ह्यांव्यतिरिक्त मुंबई पोलिसांनी त्याच्यावर यापूर्वी किमान चार गुन्हे नोंदवले आहेत. ईडीचा अधिकारी बनून एका बांधकाम व्यावसायिकाकडे १६४ कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हे शाखाने रोमी भगत आणि त्याच्या इतर साथीदार यांना अटक केली होती. या गुन्ह्यात त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांशी जवळचे संबंध
गुरुवारी दाखल झालेल्या दुसऱ्या गुन्हात रोमी भगतचा शुक्रवारी आर्थर रोड तुरुंगातून ताबा घेऊन अटक करण्यात आली आहे. पोलिस सूत्रांनी सांगितले की, भगत हा सर्वात वरचा “संबंधित एजंट” आहे आणि त्याचे काही राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांशी जवळचे संबंध आहेत. ईडीने बिल्डरच्या खंडणी प्रकरणात हिरेन भगतवर मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता. तपास ईडीच्या दिल्ली युनिटकडे वर्ग करण्यात आला आहे. ईडीला आतापर्यंत कथित खंडणी रॅकेटमध्ये त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा सहभाग आढळला नाही.
Join Our WhatsApp Community