कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेले ठिकाण…चार दिवस निवांत क्षण घालवण्यासाठी प्रत्येक जण कोकणात येत असतात. गेल्या काही वर्षात परशुरामाच्या या भूमीत बाहेरच्या देशातले पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात येऊ लागेल…मात्र आता या परशुरामाच्या पावण भूमीला ग्रहण लागले की काय असा प्रश्न पडू लागला आहे. होय ग्रहणच म्हणता येईल…आज कोरोनाचे संकट कोकणावरही आले असून, मागील वर्षीच्या तुलनेत आताची कोकणातील कोरोना रुग्णांची आकडेवारी काळजात धस्स् करणारी आहे. मग या वाढत्या आकडेवारीस जबाबदार कोण? इथले स्थानिक प्रशासन कि रत्त्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेले पालकमंत्री, असा प्रश्न आता सर्वांनाच पडू लागला आहे.
अनिल परब हे मुख्यमंत्र्यांच्या किचन कॅबिनेटमधील मानले जातात. तर उदय सामंत हे देखील मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात, तरी देखील कोकणाची ही अवस्था झाली आहे. आज साध्या बेडची देखील व्यवस्था नाही. मृत्यू होत आहेत, तरी पालकमंत्री तिकडे जात नाहीत. मुख्यमंत्री साहेब, कोकणातील लोकांनी काय पाप केले आहे की, तुमचे आमदार, खासदार, संपर्क मंत्री गायब झाले आहेत. ज्या कोकणाने तुम्हाला नेतृत्व दिले, त्या कोकणाला कोरोना काळात तुम्ही असे वाऱ्यावर सोडले आहे. विनायक राऊत हे फक्त टिव्हीवर येतात बाकी गायब असतात.
– प्रसाद लाड, भाजप आमदार
पालकमंत्री असून नसल्यासारखे!
रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला, तर इथे शिवसेनेची सत्ता आहे. पाच आमदार, एक खासदार आणि शिवसेनेचे दोन पालकमंत्री या दोन्ही जिल्ह्यांना मिळाले. पण सध्या जसे शिवसेनेचे आमदार-खासदार गायब आहेत तसेच पालकमंत्री देखील अधून मधून उगवत असल्याचे चित्र सध्या तरी पहायला मिळत आहे. विरोधक देखील सध्या तसाच आरोप करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब आहेत. पण ते जास्त मुंबईत असल्याने त्यांचे रत्नागिरी जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले की काय, असे म्हणण्याची वेळ आली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत असून, त्यांचा मतदारसंघ हा रत्नागिरी असल्याने त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा रत्नागिरी जिल्ह्यातील स्वत:च्या मतदारसंघात सर्वाधिक लक्ष आहे असा आरोप होतो. ते फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्याचा आढावा घेत असल्याचा आढावा देखील विरोधक करू लागले आहेत.
(हेही वाचा : डॉ. गुप्ताच्या विरोधात गुन्हा दाखल! ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या बातमीचा परिणाम )
पालकमंत्र्यांचा दबदबा कुठे गेला?
माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना या जिल्ह्याचा एक वेगळाच दबदबा होता. एखादी गोष्ट कोकणात कशी खेचून आणायची याचे कौशल्य नारायण राणे यांच्याकडे होते. मात्र मागील पाच वर्षांपासून या जिल्ह्यात सर्व रामभरोसे सुरु असल्याचे काही जुने जाणते लोक खासगीत बोलताना सांगत आहेत. आज पालकमंत्री देखील फक्त नावाला आहेत की काय, असा प्रश्न देखील यानिमित्ताने कोकणी जनतेच्या मनात उपस्थित झाला आहे. त्यामुळे सामंत-परबांनू आता तरी या जिल्ह्यांकडे लक्ष देवा, असे म्हणण्याची वेळ कोकणी जनतेवर आली आहे.
या जिल्ह्यात सध्या सर्व रामभरोसे सुरु आहे. आज जिल्ह्यात ऑक्सिजन अभावी लोकांचा मृत्यू होत आहे. तरी देखील ना पालकमंत्र्यांचे जिल्ह्याकडे लक्ष, ना इथल्या आमदार-खासदाराचे. आज आम्ही लोकांची परिस्थिती बघतो. लोक तडफडून मरत आहेत.
– आनंद, स्थानिक रहिवासी
पालकमंत्री खरंच मिस्टर इंडिया झाले का?
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री खरंच मिस्टर इंडिया झाले का, असा सवाल आता विरोधक विचारू लागले आहेत. माजी खासदार निलेश राणे यांना विचारले असता त्यांनी या दोन्ही जिल्ह्याची जी परिस्थिती झाली त्याला पालकमंत्री जबाबदार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या लोकांकडे कुठल्याही विषयांचा अभ्यास नाही. नामधारी मंत्री असून चालत नाही. आपल्या जिल्ह्यासाठी ती मदत खेचून आणावी लागते. हे पालकमंत्री आमदार-खासदार याला जबाबदार आहेत. रत्नागिरीचा पालकमंत्री मिस्टर इंडिया आहेत. ते फक्त मातोश्रीच्या गेटवर आहेत. उद्धव ठाकरे भाषणात येऊन सांगतात ‘माझे कोकणावर प्रेम आहे’, ते फक्त भाषणापुरते दिसले. आज अनेक जण कोकणात आले. त्यांना दिशा नाही आकार नाही. यांच्यासमोर अजेंडा नाही, असा ‘प्रहार’ निलेश राणे यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community