Ind vs Eng 3rd Test : दमदार पदार्पण करणाऱ्या सर्फराझच्या वडिलांना मिळणार महिंद्रा थार

महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून नौशाद खान यांना महिंद्रा थार देऊ केली आहे. 

245
Ind vs Eng 3rd Test : दमदार पदार्पण करणाऱ्या सर्फराझच्या वडिलांना मिळणार महिंद्रा थार
  • ऋजुता लुकतुके

१६ व्या वर्षी कांगा क्रिकेटमधील कामगिरीने सर्फराझ खान पहिल्यांदा नावारुपाला आला. त्यानंतर किमान आठ वर्षांच्या रणजी संघर्षानंतर सर्फराझ खानला भारतासाठी कसोटी खेळण्याची संधी मिळाली. आणि पहिल्याच प्रयत्नांत त्याने ६८ धावांची दमदार खेळी साकारली. तो खेळत असताना त्याने वडील आणि प्रशिक्षक नौशाद खान राजकोटच्या निरंजन शाह स्टेडिअमवर हजर होते. (Ind vs Eng 3rd Test)

सर्फराझच नाही तर त्याचा धाकटा भाऊ मुशीर खानच्या मागे वडील खंबीरपणे उभे होते. मुशीरने अलीकडेच १९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दोन शतकं ठोकली होती. नौशाद यांचा पाठिंबा, खंबीरपणा आणि मुलांसाठी केलेला त्याग याचं कौतुक म्हणून आनंद महिंद्रा यांनी नौशाद खान यांना महिंद्रा थार कार देऊ केली आहे. (Ind vs Eng 3rd Test)

सर्फराझने मोठ्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या संधीचं सोनं केलं. आणि पदार्पणात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला. पण, रवींद्र जडेजाला शतक पूर्ण करू देण्याच्या प्रयत्नांत त्याच्या धावेच्या हाकेला प्रतिसाद देताना सर्फराझचा मात्र हकनाक बळी गेला. (Ind vs Eng 3rd Test)

(हेही वाचा – Liquor Policy Scam Case : मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढ)

सर्फराझला पदार्पणाची संधी मिळाल्यावर वडील नौशाद चांगलेच भावूक झाले होते. कर्णधार रोहीत शर्मालाही त्यांनी, ‘माझ्या मुलाची काळजी घ्या,’ अशी विनंती केली. आनंद महिंद्रा यांनी थार देताना एक सुंदर संदेशही लिहिला आहे. ‘हिंमत हरू नका बस्स! धैर्य, मेहनत आणि संयम. आपल्या मुलासाठी प्रेरणादायी ठरलेल्या वडिलांसाठी हे गुण अमूल्य आहेत. अशा प्रेरणादायी वडिलांनी जर माझी महिंद्रा थारची भेट स्वीकारली तर मी कृतकृत्य होईन,’ असं संदेशात महिंद्रा म्हणाले आहेत. (Ind vs Eng 3rd Test)

ज्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सर्फराझला पाहिलंय त्यांना सर्फराझने इतकी वर्षं वाट पाहिली असंच वाटेल. कारण, ४५ सामन्यांमध्ये ७० धावांच्या सरासरीने ३,९१२ धावा केल्या आहेत. इंग्लिश लायन्स संघाविरुद्ध अलीकडे त्याने १६१ धावांची खेळी साकारली होती. (Ind vs Eng 3rd Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.