मविआ सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे बंद दाराआड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते. अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर बाहेर आले तेव्हा उद्धव यांना घाम फुटला होता. ते दोन ग्लास पाणी प्यायले होते, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. कोल्हापूरमधील शिवसेनेच्या महाअधिवेशनात ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, त्यावेळी काय झाले होते याची माहिती अजित पवार, अशोक चव्हाण यांनी मला दिली. मातोश्रीवरून डरकाळी ऐकू यायची. तिथे आता रडगाणी आणि शिव्याशाप ऐकू येत आहेत. २००९ मध्ये निवडणुकीत एकीकडे बाळासाहेब-मोदींचा फोटो लावून मतं मिळवली, पण सत्तेसाठी सगळं गमावलं. सत्तेसाठी ती बेइमानी पहिल्यांदा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाणांसोबत दिल्लीला गेले होते. ठाकरे कुटुंबातील गैरव्यवहार बाहेर येऊ लागल्यानंतर ही भेट झाली होती.
शिदेंनी केला हल्लाबोल
एकदा नाही, तर दोनदा भाजप आणि पंतप्रधान मोदींना फसवलं. लोक का जात आहेत, याचे तुम्ही आत्मपरीक्षण करावे. मातोश्रीतून आता डरकाळ्यांऐवजी शिव्याशाप ऐकू येतात. दिल्लीत तुम्ही मोदींना पुन्हा युती करण्याचे वचन दिले होते, पण तुम्ही ती केली नाही, असा हल्लाबोल कोल्हापुरातून शिंदेंनी केला आहे.
उद्धव ठाकरेंवर सडेतोड शब्दात टीका
एखादा माणूस तुमच्याकडे असला की, तो चांगला. त्याने तुमची साथ सोडली की, तो गद्दार, तो कचरा असं तुम्ही त्याला संबोधता , अशी टीका शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. एक दिवस हा महाराष्ट्र तुम्हाला कचऱ्यात जमा केल्याशिवाय राहणार नाही. आता हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब म्हणायला तुमची जीभ का कचरते? तुम्ही हिंदुत्व सोडलं नाही, असं म्हणता, मग २०१९ला कॉंग्रेसला जवळ घेतला, मांडीवर बसवलं. वीर सावरकर यांचा भर सभागृहात अपमान केला, तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं. तुमच्यावरची संकटं एकनाथ शिंदेंनी छातीवर झेलली आहेत. बाळासाहेब तमाम शिवसैनिकांचं दैवत होते. त्या दैवताचं पुण्यत्व तुम्ही सत्तेच्या मोहापायी विकलंत, आचार सोडले. एक सामान्य मुलगा मुख्यमंत्री झाल्याचं तुम्हाला दु:ख होतंय, अशी टीका करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर सडेतोड शब्दात टीका केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community