Rajya Sabha Election 2024 : राज्यसभा निवडणूक राजकीय समीकरणे बदलणार?

399
Rajya Sabha Election 2024 : राज्यसभा निवडणूक राजकीय समीकरणे बदलणार?
Rajya Sabha Election 2024 : राज्यसभा निवडणूक राजकीय समीकरणे बदलणार?

सुजित महामुलकर

देशभरातून राज्यसभेच्या एकूण ५६ जागांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत असून त्या रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी २७ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. (Rajya Sabha Election 2024) यात राज्यातील ६ जागा असून भाजपच्या तीन जागांचा समावेश आहे. भाजपने महाराष्ट्रातील या तीन जागांवरील उमेदवारांचा निर्णय अगदी शेवटच्या क्षणापर्यंत राखून ठेवल्याने अनेक नेते, राजकीय पक्ष आणि प्रसार माध्यमांची उत्कंठा वाढत गेली होती. अखेर भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर करून निवडणूक बिनविरोध होईल, अशी एक प्रकारे शाश्वती दिली. त्यामुळे कॉँग्रेसने सुटकेचा निःश्वास टाकला. चार राजकीय पक्षांच्या या सहा भावी खासदारांमुळे राज्यातील राजकीय समीकरणे काही प्रमाणात निश्चितच बदलू शकतात. (Rajya Sabha Election 2024)

(हेही वाचा – Bomb : दंगलीच्या वेळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी बॉम्ब बनवणाऱ्या जावेदला अटक)

राज्यातून शिवसेनेचे (आताचा उबाठा पक्ष) अनिल देसाई, भाजपचे प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन, कॉँग्रेसचे कुमार केतकर आणि राष्ट्रवादीच्या (आताचा राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) वंदना चव्हाण या सहा खासदारांच्या जागा रिक्त होत आहेत. विशेष म्हणजे यातील एकही खासदार या निवडणुकीतून परत राज्यसभेत जाणार नाही.

तीन अनुभवी तीन नवखे

या सहापैकी तीन उमेदवार खासदारकीचा अनुभव असलेले आहेत तर अन्य ३ नवे चेहरे प्रथमच दिल्लीला जाणार आहेत. अनुभवी असलेल्यांमध्ये भाजपचे अशोक चव्हाण (Ashok Chavan), शिवसेनेचे (शिंदे) मिलिंद देवरा (Milind Deora) आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांचा समावेश आहे. तर भाजपने २ नव्या चेहऱ्यांना, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना संधी दिली असून कॉँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे हे दिल्लीसाठी उमेदवार असतील.

कुलकर्णींचा नंबर का लागला?

भाजपने (BJP) काही दिग्गज नेत्यांचा विचार राज्यसभेसाठी न करता पक्षातील दोन निष्ठावंतांना पुढे जाण्यासाठी हात दिला. राज्यसभेसाठी चर्चेत असलेल्या नावांमध्ये विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे यांचा समावेश होता. पण पक्षाने मेधा कुलकर्णी आणि डॉ. गोपछडे या कधीही चर्चेत नसलेल्या नावांपुढे शिक्कामोर्तब केले आणि माध्यमांनाही धक्का दिला. या दोन्ही उमेदवारांचा भविष्यात पक्षाला निश्चित फायदा होईल. याचे कारण कुलकर्णी या माजी आमदार असून पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून त्या २०१४ मध्ये निवडून आल्या. २०१९ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी केली असतानाच पक्षाने त्यांचे तिकीट कापून तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या मतदारसंघातून उमेदवारी दिली. यावरून त्या नाराज होत्याच. मात्र त्यांनी उघडपणे पक्ष किंवा नेत्यांवर आरोप केले नाहीत. पण कुलकर्णी यांच्या राज्यसभा उमेदवारीमुळे नाराज असलेला ब्राम्हण समाजही आता काहीसा सावरला असून उद्या नव्या उत्साहाने लोकसभा निवडणुकीत कामाला लागेल, यात शंका नाही. लोकसभेसाठी पुण्यातून सुनील देवधर या संघाच्या तालमीत तयार झालेल्या प्रचारकाचे नाव आघाडीवर असले तरी भाजपचा जो उमेदवार असेल त्याला मिळणाऱ्या मतांमध्ये कुलकर्णी यांच्या जनसंपर्कामुळे नक्कीच वाढ होण्यास मदत होईल.

समतोल राखण्याचा प्रयत्न यशस्वी?

त्याचप्रमाणे नांदेडचे कॉँग्रेसमधून नुकतेच भाजपवासी झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह डॉ. अजित गोपछडे यांची राज्यसभेवर बढती झाल्याने नांदेडला दोन खासदार या महिन्यातच मिळतील. गोपछडे यांनी गेल्या दहा वर्षात कोणत्याही मोठ्या पदाशिवाय केलेल्या पक्षकार्याचा लाभ मराठवाड्यातील लोकसभा उमेदवारांना निश्चित होईल. या दोन्ही नांदेडकरांची उमेदवारी जाहीर करण्यामागे निश्चितच जात हा घटक डोळ्यासमोर नसला तरी चव्हाण यांना मानणारा मराठा समाज आणि गोपाछडे यांच्या मागे लिंगायत समाज ताकदीने उभा राहील, असे म्हणण्यास वाव आहे. या उमेदवारीतून पक्षाने समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. एकीकडे काँग्रेसमधून आले आणि दुसऱ्याच दिवशी राज्यसभा उमेदवारी मिळालेल्या अशोक चव्हाण यांच्यामुळे नकारात्मक संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला असता तो रोखून पक्षातील निष्ठावंतांनादेखील संधी मिळते, हा संदेश पोहोचवण्यात पक्ष यशस्वी झाला असे म्हणता येईल. एकूणच भाजपने दिलेल्या उमेदवारीनंतर राणे, तावडे, पंकजा मुंडे यांना लोकसभेची तयारी करावी लागणार असल्याचे संकेत आहेत.

(हेही वाचा – BMC : आमदार, खासदारांवर मुंबई महापालिका मेहेरबान)

फायद्याचे गणित

शिवसेनेचे मिलिंद देवरा यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या निर्णयामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्ली अगदी जवळ आल्यासारखेच आहे. राज्यसभा सदस्यत्वामुळे देवरा यांना जसा वैयक्तिक लाभ होईल तसा शिवसेनेचेही त्यांच्या राजकीय कारकिर्दीमुळे दिल्लीत वजन वाढेल. देवरा यांचे अन्य राज्यातील प्रादेशिक, राष्ट्रीय पक्षांशी, नेत्यांशी असलेले जुने संबंध, पक्षाची देश पातळीवर भूमिका काय असावी, तसेच राज्यसभा, लोकसभेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विषयाबाबत शिवसेनेची भूमिका देशभर पोहोचवण्यास मदतच होईल. याशिवाय भविष्यातील विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही देवरा यांच्या अनुभवाचा आणि जनसंपर्क यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रगतीचा आलेख उंचावत जाण्यास मदत होऊ शकेल.

भरपाईचा प्रयत्न

जून २०२२ मध्ये विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असलेल्या माजी महापौर, माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांचा महाविकास आघाडीची मते फुटल्याने पराभव झाला होता. आता त्यांची उमेदवारी जाहीर करून पक्षाने त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न केलाच, शिवाय पारंपरिक दलित जातीचे कार्ड खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. हंडोरे यांना उमेदवारी दिल्याने पक्षातील मरगळ काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता असली तरी पक्षाला त्यांच्या उमेदवारीचा किती लाभ उठवता येईल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. सध्या माजी मंत्री वर्षा गायकवाड या मुंबई कॉँग्रेस अध्यक्षपदी असल्या तरी पक्ष सुस्तावला असल्याचे चित्र दिसत आहे.

राष्ट्रवादीचे धक्कातंत्र

या सहापैकी सगळ्यात बुचकळ्यात टाकणारी उमेदवारी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांची. पुढे तीन वर्षाहून अधिक खासदारकीचा काळ शिल्लक असताना पटेल यांना पक्षाकडून देण्यात आलेली राज्यसभेची उमेदवारी पक्षाच्या राजकीय रणनीतीचा भाग असल्याचे पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पण या खेळीमुळे पक्षाकडे एक पत्ता (राज्यसभेची जागा) शिल्लक राहिला असल्याचे मानले जात आहे, ज्याचा शरदचंद्र पवार गटातील अथवा अन्य पक्षातील बड्या नेत्याला आकर्षित करण्यासाठी पुरेपूर उपयोग करून घेता येऊ शकतो. याशिवाय एक मोठी अतिरिक्त जागा शिल्लक ठेवल्याने आगामी लोकसभेत पराभूत होणाऱ्या, मात्र पक्षासाठी ‘उपयुक्तता’ असणाऱ्या नेत्याला या जागेवर पुनर्वसित करता येऊ शकेल, हा विचार असू शकतो. मात्र या ‘अति’रिक्त जागेवरून भविष्यात महायुतीत वाद होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. (Rajya Sabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.