राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना (MARD) यांच्यासोबतच्या राज्य सरकारची चर्चा फिस्कटली, त्यामुळे गुरुवार, २१ फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार (Doctor Strike) आहेत. ७ फेब्रुवारी रोजीच मार्डने संपाची हाक दिली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत चर्चा झाली होती. यशस्वी वाटाघाटी झाल्या. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच दिवशी संप मागे घेत असल्याची घोषणा केली होती. आता मान्य झालेल्या मागण्यांची अंमलबजावणीच केली नसल्याचा आरोप करत निवासी डॉक्टर पुन्हा संपावर जाणार आहेत.
शासनाने डॉक्टरांच्या मागण्या मान्य करूनही त्याची अंमलबजावणी वेळेत न केल्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टर संघटना (मार्ड) गुरुवारी संध्याकाळपासून संपावर जाणार (Doctor Strike) असल्याचे परिपत्रक काढून जाहीर केले आहे. विद्यावेतनात दहा हजार रुपयांची भरीव वाढ करण्याबरोबरच दर महिन्याच्या ठरावीक तारखेला नियमितपणे वेतन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच वसतिगृह तातडीने दुरुस्त करणार असल्याचे डॉक्टरांना यावेळी सांगितले होते.
किती वैद्यकीय महाविद्यालयावर होणार परिणाम?
राज्यात सध्याच्या घडीला एकूण २५ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या संपामुळे या सर्व महाविद्यालयांवर परिणाम होणार आहे. मार्डने गेल्या वर्षी सुद्धा संपाची हाक दिली होती. आश्वासनानंतर ३ जानेवारीला संप मागे घेण्यात आला होता. सरकारने आश्वासनाकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा एकदा संपाची (Doctor Strike) हाक देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community