Buldhana: बुलढाण्यातल्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओचं सत्य; दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं… वाचा नक्की काय घडले?

२०० रुग्णांचे वाचवले प्राण, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांचं होतेय कौतुक

405
Buldhana: बुलढाण्यातल्या 'त्या' व्हायरल व्हिडिओचं सत्य; दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... वाचा नक्की काय घडले?
Buldhana: बुलढाण्यातल्या 'त्या' व्हायरल व्हिडिओचं सत्य; दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... वाचा नक्की काय घडले?
  • नमिता वारणकर 

महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे एका धार्मिक कार्यक्रमात प्रसाद खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याच्या घटनेत २०० लोकं आजारी पडले. मंगळवारी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडियो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडियोमध्ये रुग्णालयाच्या आवारात रुग्ण उपचार घेताना दिसत आहेत. परिसरात दोऱ्या बांधून त्या दोरीला सलाईन लावून रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे दृष्य दिसत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना अन्नातून विषबाधा कशी झाली आणि त्यांना नेमके कुठे आणि कसे उपचार मिळत आहेत तसेच या व्हायरल व्हिडियोमागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न ‘हिंदुस्थान पोस्ट’ने केला. तेव्हा यामागे लपलेलं डॉक्टर आणि त्यांच्या पथकांचं खरं श्रेय उजेडात आलं.

‘हिंदुस्थान पोस्ट’ने बुलढाण्याच्या ग्रामीण रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. एस. एम. चव्हाण यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, ग्रामीण रुग्णालय हे अवघे ३० खाटांचे आहे. तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात विषबाधा झालेल्या रुग्णांवर रुग्णालयाच्या आवारात उपचार सुरू केले. मुख्य म्हणजे योग्य वेळी आमचे डॉक्टरांच्या पथकाने योग्य वेळी शिवाय जागेची कमतरता असूनही रुग्णांवर आवारातच रुग्णांना दाखल करून घेऊन उपचार करायला सुरुवात केल्यामुळे आज सर्वच रुग्ण सुखरूप बरे होऊन आपआपल्या घरी परतले आहेत. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, मात्र असे असले तरीही हा व्हिडियो सोशल मिडियावर शेअर करून आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे काढले जात आहेत. त्यामुळे आता रुग्णांवर वेळेत उपचार करून त्यांना बरे करणाऱ्या डॉक्टरांचे कौतुक करायचे की आरोग्य यंत्रणेचे वाभाडे काढायचे हे ज्याचे त्याने ठरवावे.

बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान भगर आणि आमटीच्या प्रसादाचे वाटप भक्तांना करण्यात आले होते. या प्रसादाचं सेवन केल्यावर भाविकांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात जागा अपुरी असल्याने अनेक रुग्णांवर चक्क रुग्णालयाच्या आवारात दोरीला सलाईन लटकवून उपचार करण्याची वेळ आली. हे दृष्य सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडियोमध्ये दिसत आहे.

ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक
यासंदर्भात बुलढाण्याच्या ग्रामीण रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. एस. एम. चव्हाण आणि त्यांच्या पथकाने या रुग्णांवर उपचार केले. या घटनेसंदर्भात ते म्हणाले की, अन्नातून विषबाधा झालेल्या २०० रुग्णांवर रुग्णालयाच्या आवाराच उपचार केले. त्यांची प्रकृती सुधारल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला. बुलढाण्यातील इतरही काही रुग्णालय आणि आवारात त्यांच्यावर उपचार सुरू होते. यापैकी १४२ रुग्णांना बीबी ग्रामीण रुग्णालयात, २० जणांना लोणार येथे , तर ३५ रुग्णांना मोहकर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रुग्णालयात जागा अपुरी असूनही रुग्णांना मिळाले योग्य उपचार !
यासंदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले की, रुग्णांवर उपचार करणे आवश्यक आहे. कुठे उपचार दिले यापेक्षा त्याच्यावर योग्य उपचार होऊन त्यांचे जीव वाचले, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता गंभीर परिस्थिती नाही. सगळे रुग्ण योग्य उपचार घेऊन आपआपल्या घरी गेले आहेत. त्यामुळे रुग्णालयात जागा अपुरी असूनही रुग्णांना योग्य उपचार मिळाल्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचे सिव्हिल डॉ. एम. एस. चव्हाण आणि त्यांच्यासोबत रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विषबाधा झालेल्या प्रसादाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून तपास सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.