Gadge Maharaj : ’स्वच्छ भारत’चा संदेश देणारे कर्मयोगी गाडगे बाबा

गाडगे महाराज म्हणजेच संत गाडगेबाबा यांना महाराष्ट्रात न ओळखणारा एकही व्यक्ती सापडणार नाही.

176
Gadge Maharaj : ’स्वच्छ भारत’चा संदेश देणारे कर्मयोगी गाडगे बाबा
Gadge Maharaj : ’स्वच्छ भारत’चा संदेश देणारे कर्मयोगी गाडगे बाबा

गाडगे महाराज (Gadge Maharaj) म्हणजेच संत गाडगेबाबा यांना महाराष्ट्रात न ओळखणारा एकही व्यक्ती सापडणार नाही. आपल्या कीर्तनातून ते गोरगरिबांना गावातील लोकांना जीवनमूल्ये आणि समाजमूल्ये यांची शिकवण देत असत. ते वेगवेगळ्या गावांना जाऊन स्वच्छता, सुधारणा आणि सामाजिक न्याय यांबद्दल लोकांना उपदेश करत असत. जनसामान्यांमध्ये मिसळण्यासाठी त्यांनी स्वतःचं रहाणीमानही अतिशय साधे ठेवले होते. आज आपण संत गाडगेबाबांविषयी आणखी थोडी माहिती जाणून घेणार आहोत.

संत गाडगेबाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ साली अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शेंडगाव या ठिकाणी झाला. त्यांचं पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असं होतं. त्यांचे वडील धोबी काम करायचे. पण त्यांना दारूचे खूप व्यसन होते. त्या व्यसनामुळे गाडगेबाबांच्या वडिलांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम झाला आणि ते दगावले. त्यावेळी संत गाडगेबाबा खूप लहान होते. वडील नसल्यामुळे गाडगेबाबांचं बालपण आईच्या माहेरी म्हणजेच त्यांच्या मामाच्या घरी गेलं.

वडील नव्हते म्हणून आईला आधार देण्यासाठी गाडगेबाबा शेतात काम करायला लागले. नांगरणी करणं, गुरं राखणं अशी शेतीवाडीची कामं ते करत असत. त्यांना सगळी कामं करायला आवडायचं. स्वच्छता करणं हा त्यांचा विशेष गुण होता. गाडगेबाबांचं लहानपणीच लग्न झालं होतं. पण ते आपल्या संसारात फारसे रमले नाहीत.

(हेही वाचा – IPL 2024 : पहिल्या २ आठवड्याचं वेळापत्रक जाहीर, बंगळुरू वि चेन्नई सामन्याने होणार सुरुवात )

गावात कुठेही कोणाला काही मदत हवी असेल तर गाडगेबाबा नेहमीच धावून जायचे. सगळ्यांनी मिळून एकमेकांना मदत केली पाहिजे अशी शिकवण ते सगळ्या लोकांना द्यायचे. १ फेब्रुवारी १९०५ साली त्यांनी आपल्या घरादाराला कायमचा राम राम ठोकला आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण करण्यासाठी निघाले. त्यांच्या हातात नेहमीच एक झाडू असायचा, अंगावर एक फाटकी गोधडी, एका कानात बांगडी आणि डोक्यावर फुटके गाडगे असा त्यांचा वेष असायचा.

ज्या गावात गाडगे बाबा जायचे त्यागावत ते दिवसभर स्वच्छता करायचे, झाडू मारायचे. गावातल्या लोकांकडे अन्न मागून स्वतःचं पोट भरायचे. संध्याकाळी गावातल्याच एका देवळात कीर्तन करायचे. आपल्या कीर्तनातून ते स्वच्छतेचे महत्त्व, माणुसकी जपणे, एकमेकांना मदत करणे, अंधश्रद्धा निर्मूलन, वाईट रूढी परंपरा सोडून देणे या विषयांवर लोकांचे प्रबोधन करायचे. याव्यतिरिक्त त्यांनी व्यसनांचे दुष्परिणाम, देवाच्या नावाखाली मूक्या प्राण्यांची हत्या यांसारख्या विषयांवरही लोकांना प्रबोधन केले. त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी गावातली खूप लोकं जमा होत असत.

गाडगेबाबांनी महाराष्ट्रात धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अनेक धर्मशाळाही बांधल्या. गाडगेबाबा भुकेल्या लोकांना अन्न मिळावं, तहानलेल्या लोकांना पाणी मिळावं, गोरगरिबांना अंगभर कपडे मिळावेत, तसेच वेळोवेळी त्यांच्यावर योग्य औषधोपचार व्हावेत, घर नसलेल्यांना राहण्यासाठी आसरा मिळावा, मुलांना शिक्षण मिळावे, एवढंच नाहीतर पशुपक्ष्यांना विमुक्त जगता यावे म्हणून आयुष्यभर झटत होते. त्यांनी स्वच्छ भारताचा संदेश दिला. आयुष्यभराच्या प्रवासाने आणि धकाधकीच्या जीवनाने २० डिसेंबर १९५६ साली अमरावतीजवळच्या वलगाव या ठिकाणी पेढी नावाच्या नदीच्या पुलाजवळ त्यांना देवाज्ञा झाली. तिथे त्यांची समाधी बांधलेली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.