१९९०चे दशक हे देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातील संक्रमणाचा काळ होता. या काळात प्रथमच राजकारणाला हिंदुत्वाच्या विचारांची किनार मिळाली. कालपर्यंत मराठा माणसाच्या न्यायहक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेची हिंदुत्वाच्या विचारांचा पक्ष असलेल्या भाजपसोबत युती झाली. त्यानंतर शिवसेनेच्या राजकारणात हिंदुत्व हे प्राधान्यक्रमात आले. त्याच वेळी मनोहर जोशी (Manohar Joshi) यांनी दादर येथे विधानसभा निवडणूक लढवली, तेव्हा प्रचारात थेट हिंदुत्वाच्या आधारे मते मागितली. शिवसेनेच्या या नव्या विचाराचा मतदारांनी स्वीकार केले आणि मनोहर जोशी विजयी झाले. मात्र त्याच्याकडून पराभूत झालेले काँग्रेसचे भाऊराव पाटील यांनी मात्र जोशी यांनी हिंदुत्वाच्या आधारे मते मागून निवडणूक नियमांचा अवमान केल्याचे सांगत न्यायालयात धाव घेतली. याचा निकाल मनोहर जोशींच्या विरोधात लागल्याने त्यांना आमदारकी सोडावी लागली होती.
(हेही वाचा Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन)
निवडणुकीच्या प्रचारात बाळासाहेब म्हणालेले, हिंदुस्थानात राहतो तो हिंदू !
भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत शिवसेना भाजप ही हिंदुत्वाच्या आधारावरची युती घडवून आणली. त्यामुळे १९९० साली शिवसेनेचे ५२ आणि भारतीय जनता पक्षाचे ४२ आमदार विधानसभेत निवडून आले. यावेळी मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची बाळासाहेब ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली. याच दरम्यान, दादर मतदारसंघात मनोहर जोशी यांच्याकडून पराभूत झालेल्या काँग्रेसच्या भाऊराव पाटील यांनी मनोहर जोशी यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली. गिरगाव चौपाटीवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या प्रचारासाठी जाहीर सभेत भाषण करतांना, “महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरात मध्ये राहतो तो गुजराती, बंगाल मध्ये राहतो तो बंगाली या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदु, आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नव्हे !” असे ठणकावून सांगितले होते. हाच आधार घेऊन भाऊराव पाटील यांनी मनोहर जोशी यांनी हिंदु म्हणून धर्माच्या नावाखाली निवडणूक लढविल्याचा आणि तो निवडणूक भ्रष्टाचार असल्याचा मुद्दा मनोहर जोशी यांच्या विरोधात मांडला.
(हेही वाचा Manohar Joshi : महापालिकेतील लिपिक ते लोकसभा अध्यक्ष; असा होता डॉ. मनोहर जोशी यांचा जीवन प्रवास)
मनोहर जोशींचे हिंदुत्वावरील ‘ते’ विधान सर्वोच्च न्यायालयाने केले मान्य
१९९१ साली छगन भुजबळ यांच्या समवेत १५ आमदारांनी शिवसेना सोडून काँग्रेस प्रवेश केला, त्यामुळे विधानसभेत शिवसेनेचे विरोधी पक्षनेते पद भारतीय जनता पक्षाच्या गोपीनाथ मुंडे यांच्याकडे गेले. १९९०-१९९१ हे एक वर्ष विरोधी पक्षनेते राहिलेल्या मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना मुंबई उच्च न्यायालयातील निकाल त्यांच्या विरोधात गेल्यामुळे आमदारकी सोडावी लागली. १९९५ साली पुन्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युती विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आणि १९९० साली थोडक्यात हुकलेली युतीची सत्ता १९९५ साली आली. १४ मार्च १९९५ रोजी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर मनोहर गजानन जोशी यांनी मुख्यमंत्री तर गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून ऐतिहासिक व अभूतपूर्व सोहळ्यात शपथ घेतली. महाराष्ट्रात १९७८ नंतर पुन्हा एकदा बिगर काँग्रेसचे शिवशाही सरकार आले. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत भाऊराव पाटील यांनी त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती एस.एन. वरियावा यांनी निकाल देतांना मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची निवड रद्दबातल केली होती. भाऊराव पाटील यांचे देहावसान झाल्यामुळे त्यांचे चिरंजीव आणि कामगार नेते नितीन भाऊराव पाटील यांनी हा खटला पुढे चालविला. मुंबई उच्च न्यायालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची व्याख्या डॉ. मनोहर जोशी यांचे वकील जय चिनॉय यांनी न्यायमूर्ती एस. एन. वरियावा यांच्या समोर रेकॉर्ड वर आणली. ‘महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरात मध्ये राहतो तो गुजराती, बंगाल मध्ये राहतो तो बंगाली या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदु’, ही संपूर्ण व्याख्या सादर करुन त्याची सत्यता पडताळण्यासाठी दै. सामना चे वेगवेगळे तेरा अंक न्यायमूर्तींसमोर सादर केले. मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर तो सर्वोच्च न्यायालयात गेला आणि सारे युक्तिवाद, कागदपत्रे, पुरावे पाहिल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जे. एस. वर्मा यांनी मी सादर केलेली बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची व्याख्या ग्राह्य मानून ११ डिसेंबर १९९५ रोजी निकाल दिला आणि डॉ. मनोहर जोशी यांची हिंदुत्वाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. यावेळी मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते आणि नागपूर येथे विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होते. मनोहर जोशी यांचे अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मुद्दाम नागपुरात दाखल झाले होते.
Join Our WhatsApp Community