शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेत राहिलेले मनोहर जोशी (Manohar Joshi) जेव्हा जेव्हा शिवसेनेचा संघर्षाचा काळ आला, संकटे आली, तेव्हा तेव्हा ते चाणक्याची भूमिका बजावत राहिले. म्हणून मनोहर जोशी उर्फ पंत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासातील नेते होते. बाळासाहेबांच्या शेजारी कायम मनोहर जोशी यांना पाहण्याची शिवसैनिकांना जणू सवयच जडली होती. अशा मनोहर जोशी यांना याच शिवसेनेमुळे जीवनातील अत्यंत कटू प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. ज्या प्रसंगानंतर मनोहर जोशी यांचा राजकीय पटलावरील किंबहुना शिवसेनेच्या परिघावरील वावर जणू संपुष्टातच आला.
बाळासाहेबानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पडले एकाकी
जोवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, तोवर त्यांच्या सोबतचे साथीदार मग मनोहर जोशी (Manohar Joshi) यांच्यापासून ते दिवाकर रावते, लीलाधर ढाके, गजानन कीर्तिकर अशा अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पक्षात मानसन्मान होता. मात्र १७ नोव्हेंबर २०१२ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले आणि शिवसेनेमध्ये नव्या पिढीचा वावर वाढू लागला. एव्हाना शिवसेनेची सर्व सूत्रे उद्धव ठाकरे यांनी हाती घेतली होती. त्यांचे सल्लागार म्हणून संजय राऊत तयार झाले होते. आदित्य ठाकरे यांचा पक्षातील निर्णयप्रक्रियेत सहभाग वाढला होता. त्यांच्या माध्यमातून तरुणांना शिवसेनेतील विविध महत्वाच्या पदांवर नियुक्त करण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे साहजिकच होणाऱ्या महापालिका निवडणुकांपासून ते विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये नव्यांना संधी मिळू लागली आणि जुन्या जाणत्या शिवसैनिकांपासून ते मनोहर जोशी यांच्यासारख्या बाळासाहेब ठाकरे यांच्या अष्टप्रधान मंडळातील ज्येष्ठ नेत्यांना तिकिटे नाकारण्यात येऊ लागली.
(हेही वाचा Manohar Joshi : हिंदुत्वाच्या आधारे मते मागितल्याने मनोहर जोशींना १९९१ मध्ये सोडावी लागलेली आमदारकी)
बाळासाहेबांच्या निधनानंतर मनोहर जोशींना नाकारले लोकसभेचे तिकीट
बाळासाहेबांच्या निधनानंतर २०१४च्या लोकसभा निवडणुकीचा बोलबाला सुरु झाला होता. त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनी दादरमधून मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला. मनोहर जोशी यांना निवडणुकीच्या राजकारणापासून दूर करण्याचा हा उद्धव ठाकरे यांचा निर्णय मनोहर जोशी यांना फारसा पचनी पडला नाही आणि त्यांनी अधिकारवाणीने त्यांची नाराजी व्यक्त केली. पण मनोहर जोशी यांना कदाचित कल्पना नव्हती कि मातोश्रीतील वातावरण बदललेले आहे. तेथील सल्लागार वेगळे आहेत. त्याचे परिणाम पंतांना भोगावे लागले.
(हेही वाचा Manohar Joshi : महापालिकेतील लिपिक ते लोकसभा अध्यक्ष; असा होता डॉ. मनोहर जोशी यांचा जीवन प्रवास)
दसरा मेळाव्यातच ‘मनोहर जोशी चले जाव’ अशा घोषणा
बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पहिला दसरा मेळावा १४ ऑक्टोबर २०१३ रोजी पार पडला. त्यावेळी नेहमीप्रमाणे व्यासपीठावर सर्व प्रमुख नेत्यांसोबत मनोहर जोशीही विराजमान झाले खरे. पण आधीच जोशी (Manohar Joshi) सरांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये दारुगोळा भरण्यात आला होता जो दसरा मेळाव्यात नियोजनबद्धपणे फुटला. पंत व्यासपीठावर बसताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. बाळासाहेबांचे छायाचित्र असलेले फलक उंचावत ‘मनोहर जोशी चले जाव’ अशा घोषणा देण्यात येऊ लागल्या. व्यासपीठावरील सर्वच नेते शांतपणे बसून होते. त्यामुळे भांबावलेले जोशी खुर्चीतून उठले आणि उजवीकडून तडक खाली उतरले. तेथून ते थेट आपल्या घरी निघून गेले. त्यानंतर जणू काहीच घडले नाही, अशा वातावरणात उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू झाले. उद्धव यांच्यासह एकाही नेत्याने जोशी यांना रोखण्याची तसदी घेतली नाही.
…आणि पंतांचे राजकीय जीवन संपले
उभे आयुष्य शिवसेना या शब्दाला वाहून देणारे मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्याच शिवसेनेने त्यांच्या मनाला प्रचंड वेदना देणारी घटना घडवली. या अपमानानंतर मनोहर जोशी हे राजकीय पटलावरून आणि शिवसेनेच्या परिघातून बाहेर फेकले गेले ते शेवटपर्यंत पुन्हा परतलेच नाहीत.
Join Our WhatsApp Community