मनोहर जोशी (Manohar Joshi) यांच्या निधनाने देशातील असामान्य व्यक्तिमत्व हरपले. त्यांच्या जाण्याचे मला अतीव दुःख झाले आहे. गेल्या काही वर्षांत त्यांचा शिवसेनेशी फारसा संबंध राहिला नव्हता. देशपातळीवर असा एकच पुढारी झाला ज्याने नगरसेवक, महापौर, आमदार, मुख्यमंत्री, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभेचे अध्यक्ष अशी सर्व पदे भूषविली. असे जोशी पुन्हा न होणे, असा शब्दांत ज्येष्ठ अंपायर माधवराव गोठोस्कर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली.
मला रामशास्त्री म्हणायचे…
जोशीसर शिवसेना स्थापन झाल्यापासूनच शिवसैनिक होते. ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यावेळी मी कमिटी मेंबर होतो. असोसिएशनमध्ये त्यांचा गट वेगळा होता आणि आमचा गट वेगळा होता. बैठकांमध्ये मला काही मुद्दा मांडायचा असेल, तर ते मला ‘रामशास्त्री बोला’, असे म्हणायचे. मला ते नेहमी रामशास्त्री म्हणत. मी सांगितलेले मुद्दे ते स्वीकारायचे. कसोटी सामान्यांच्या वेळी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना घेऊन यायचे. तेव्हा बाळासाहेब माझ्याशी आपुलकी बोलत, त्यावेळी जोशी सरांना (Manohar Joshi) आश्चर्य वाटले. कारण त्यांना माहीत नव्हते की, बाळासाहेबांचा आणि माझा आधीपासूनच परिचय आहे. जेव्हा ३० ऑक्टोबर १९९८ रोजी शिवाजी पार्क जिमखाना येथे सामना ट्रॉफी म्हणून सामने खेळवले गेले होते. त्यावेळी बाळासाहेबांची मी मुलाखत घेतली होती आणि जोशी सर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून तिथे होते, असे गोठोस्कर म्हणाले.
…आणि माझे कौतुक केले
एके दिवशी जिमखान्याचा क्रिकेटचा सामना होता आणि मी जिमखान्याचा माजी अध्यक्ष असल्यामुळे तिथे हजर होतो. त्यावेळी तिथे बैठक होती, तेव्हा मी म्हटले की, ‘आज बैठक लवकर संपवा मला लवकर घरी जायचे आहे.’ तेव्हा जोशीसर म्हणाले, ‘काय आहे घरी?’, मी म्हटले ‘आज माझा सत्तरावा वाढदिवस आहे.’ तेव्हा जोशीसर पटकन म्हणाले, ‘हे खोटे बोलत आहेत.’ मी जरा चमकलो. तेव्हा जोशीसर (Manohar Joshi) म्हणाले की, ‘रामशास्त्री ७० वर्षांचे वाटत नाहीत, तर ५० वर्षांचे वाटतात.’ असे कौतुक त्यांनी केले होते, असेही गोठोस्कर म्हणाले.
मुख्यमंत्री असतानाही तत्परतेने केली मदत
जोशीसर शिवाजी पार्कला राउंड मारायचे, तेव्हा त्यांची अनेकदा भेट व्हायची, आम्ही गप्पा मारायचो. ते मुख्यमंत्री झाले तेव्हाही एक-दोनदा वर्षा बंगल्यावर गेलो होतो. आमच्या जिमखान्याचे लीझ रिन्यूव्ह होत नव्हते म्हणून आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती, त्यामुळे वर्षा बंगल्यावर जोशीसरांना (Manohar Joshi) भेटायला येणाऱ्यांची मोठी रांग लागली होती. मला पाहिल्यावर त्यांनी मला बोलावले आणि त्यांनी त्यांचा कार्यक्रम थांबवून माझे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर तेथूनच महापालिकेचे आयुक्त गोखले यांना त्वरित फोन लावून त्यांना सांगितले आणि दुसऱ्या दिवशी ते तुमचे काम करतील असे आम्हाला म्हणाले. प्रत्येक वेळेला ते तत्परतेने काम करायचे, असे गोठोस्कर म्हणाले. आमच्याकडे जिमखान्याच्या क्रिकेटची टूर्नामेंट व्हायची. तेव्हा आम्ही त्यांना आमंत्रण द्यायला त्यांच्या दादर, रानडे रोड येथील कार्यालयात जायचो, तेव्हा ते मुख्यमंत्री नव्हते. तेव्हा ते न चुकता टुर्नामेंटला हजेरी लावायचे. १९९४ साली जेव्हा आमचा जिमखाना नवीन बांधला तेव्हा त्याचे उद्घाटन जोशीसरांनी केले. त्यांना सगळा जिमखाना दाखवण्याचे काम माझ्याकडे आले होते. याचा मला अभिमान वाटतो, असेही माधवराव गोठोस्कर म्हणाले.
Join Our WhatsApp Community