बाजीराव-मस्तानी, ब्लॅक, खामोशी असे भन्नाट चित्रपट बनवणारे सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक Sanjay Leela Bhansali

276
संजय लीला भन्साली (Sanjay Leela Bhansali) हे हिंदी चित्रपट सृष्टीतले प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि संगीतकार आहेत. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९६३ रोजी झाला. १९९९ साली त्यांनी एसएलबी नावाचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं. संजय लीला भन्साली यांच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांच्या चित्रपटांचे सेट्स खूप भव्यदिव्य आणि महागडे असतात. संजय लीला भन्साली यांचे चित्रपट बिग बजेट चित्रपट म्हणून ओळखले जातात. २०१५ साली त्यांना भारतीय केंद्र शासनाने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
संजय लीला भन्साली (Sanjay Leela Bhansali) यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला विधु विनोद चोप्रा यांच्या परींदा आणि १९४७ अ लव्ह स्टोरी या चित्रपटांत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. त्यानंतर १९९६ साली खमोशी: द म्युझिकल या चित्रपटाद्वारे संजय लीला भन्साळी यांनी स्वतंत्र दिग्दर्शन करायला सुरुवात केली. त्यांच्या या चित्रपटाला क्रिटिक्सचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारही मिळाला होता.
२००२ साली संजय लीला भन्साली (Sanjay Leela Bhansali) यांचा प्रदर्शित झालेला देवदास चित्रपट, त्या वेळेसचा तो सर्वात महागडा चित्रपट होता. हा चित्रपट तयार करण्यासाठी ५० कोटींचं भांडवल लागलं होतं. पण त्यावेळेस देवदास या चित्रपटाने १०० कोटींचा व्यवसाय केला होता. याव्यतिरिक्त या चित्रपटाने पाच राष्ट्रीय पुरस्कार आणि दहा फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळवले होते. २००५ साली संजय लीला भन्साली यांना आपल्या ब्लॅक नावाच्या चित्रपटासाठी पुन्हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.
२००७ साली संजय लीला भन्साली (Sanjay Leela Bhansali) यांचा सावरिया चित्रपट आला. त्या चित्रपटात रणबीर कपूर, सोनम कपूर आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका होत्या. चित्रपट फारसा चालला नाही पण या चित्रपटात रणबीरने केलेल्या अभिनयाची खूप प्रशंसा करण्यात आली. त्यानंतर २०१० साली हृतिक रोशन आणि ऐश्वर्या रॉय यांच्या प्रमुख भूमिका असलेला गुजारीश हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात संजय लीला भन्साली यांनी म्युझिक डायरेक्टर म्हणून पदार्पण केले होते.
त्यानंतर २०१३ साली त्यांचा रामलीला नावाचा चित्रपट आला होता. पण रामलीला या नावामुळे बरेच वाद निर्माण झाले म्हणून नंतर चित्रपटाचं नाव बदलून गोलीयोंकी रासलीला.. रामलीला असं ठेवण्यात आलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्यानंतर पुढे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणाऱ्या रणवीर सिंग आणि दिपीका पादुकोन यांच्यासोबत बाजीराव मस्तानी नावाचा चित्रपट संजय लीला भन्साली यांनी काढला. त्यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटात पेशवा बाजीराव यांच्या भूमिकेत रणवीर सिंग, काशीबाईंच्या भूमिकेत प्रियांका चोप्रा आणि मस्तानीच्या भूमिकेत दिपीका पादुकोन दिसली होती.
आज भन्साली यांचा जन्मदिवस. त्यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा…

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.