स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या ५८व्या आत्मार्पण दिवसानिमित्त दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. २४ ते २६ फेब्रुवारी या तीन दिवसीय कार्यक्रमांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित आणि अनंत वसंत पणशीकर निर्मित नाटक ‘संगीत उत्तरक्रिया’ तसेच ‘साहित्यसूर्य सावरकर’ हा संगीतमय कार्यक्रम आणि ज्येष्ठ संगीतकार स्व. सुधीर फडके यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेल्या ‘वीर सावरकर’ या चित्रपटाचा प्रिमियर शो रसिकांना पाहता येणार आहे.
नाटक – संगीत उत्तरक्रिया
महाराष्ट्र शासन आणि पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, दुर्मिळ नाटक जतन आणि संवर्धन योजना २०२३-२४ अंतर्गत संग्रहित करण्यासाठी निवडलेले अनंत वसंत पणशीकर निर्मित आणि स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) लिखित ‘नाटक – संगीत उत्तरक्रिया’ या नाटकाचा प्रयोग शनिवारी, २४ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात होणार आहे. दुसऱ्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांनी अब्दालीच्या सैन्याचा पराभव करून पानिपतच्या पराभवाचे उट्टे काढले. त्या वीरगाथेची कहाणी ‘संगीत उत्तरक्रिया’ या नाटकात प्रेक्षकांना पाहता येईल. दिग्दर्शक डॉ. अनिल बांदिवडेकर, नेपथ्य – सचिन गांवकर, संगीत – मयुरेश माडगावकर, रंगभूषा राजेश परब, प्रकाशयोजना शाम चव्हाण, वेशभूषा नीता पणशीकर, ध्वनी मुद्रण – सावरकर स्टुडियोज यांचे आहे. या नाटकाला स्वेच्छामूल्य आहे.
‘संगीत उत्तरक्रिया’ या नाटकाचे निर्माते अनंत पणशीकर यांच्याशी ‘हिंदुस्थान पोस्ट’ने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी २५ फेब्रुवारीला आत्मार्पण दिवसाच्या पूर्वसंध्येला ‘माझी जन्मठेप’ नाटकाचा पहिला प्रयोग केला. या ग्रंथाचं संकलन करून नाटक तयार केलं. त्याचं अभिवाचन केलं होतं. हा आम्ही पहिला प्रयोग केला होता. त्याआधी बरंचसं वीर सावरकरांच्या साहित्याचं वाचन केलं. त्यानंतर आता वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावरील नाटक करण्याची इच्छा होती. ‘संन्यस्थ खड्ग’ हे नाटक बऱ्याच जणांनी केलं आहे. त्यामुळे ‘संगीत उत्तरक्रिया’ या नाटकाची निवड केली. गेल्या १५ वर्षांत तरी या नाटकाचा प्रयोग कोणी केल्याचं ऐकलं नव्हतं. डॉक्युमेंटेशन आणि रंगमचावर प्रयोग सादरीकरण या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून ‘संगीत उत्तरक्रिया’ या नाटकाची निर्मिती दिग्दर्शक डॉ. अनिल बांदिवडेकर यांच्यासह केली आहे. नाटकातील वीर सावरकर यांनी लिहिलेले संवाद जसेच्या तसेच आम्ही ठेवले असून त्यांच्या भाषेत कोणताही बदल केलेला नाही. पेशव्यांनी केलेल्या पानिपतच्या युद्धाची कहाणी या नाटकात रंगवण्यात आली आहे. पूर्वीच्या काळातील श्रुती, ऋचा यांचा वापरही यामध्ये केला आहे.
(हेही वाचा Veer Savarkar : गांधी हत्येच्या कथित आरोपामुळे हिंदुत्ववादी संघटना ६० वर्षे मागे गेल्या – रणजित सावरकर )
प्रेक्षकांनी नाटक का पाहावं?
वीर सावरकर यांचे विचार मांडणारी व्यक्तिरेखा यामध्ये साकारली आहे. त्याद्वारे प्रेक्षकांना खऱ्या इतिहासाबरोबरच स्वातंत्र्यवीरांचे देशप्रेमही कळेल. त्यांच्या भाषेचीही ओळख होईल. ‘संगीत उत्तरक्रिया’ या नाटकाचा विषय जरी ऐतिहासिक असला, तरीही आजच्या काळाला अनुरुप असं हे नाटक आहे. धर्म बदलणं, मराठ्यांची शूरता, त्यांच्यातील प्रचंड देशाभिमान, शौर्य, जातीच्या पलीकडे विचार करायला लावणारं, राष्ट्रप्रेम जागृत करणारं हे नाटक आहे. म्हणून ते प्रेक्षकांनी आवर्जून पाहावं, असे या नाटकाचे वेगळेपण निर्माते अनंत पणशीकर यांनी सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सांगितिक मानवंदना – ‘साहित्यसूर्य सावरकर’
स्वातंत्र्यवीरांनी वर्णिलेल्या भारताच्या दैदिप्यमान इतिहासातील तेजस्वी ताऱ्यांना मानवंदना देणारा दृकश्राव्य सांगितिक कार्यक्रम ‘साहित्यसूर्य सावरकर’ रविवार, २५ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाची संहिता आणि संकल्पना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांची असून कार्यक्रमाचे संगीत संयोजन-दिग्दर्शन वर्षा भावे यांनी केले आहे. कार्यक्रमाकरिता रणजित सावरकर यांचे मार्गदर्शन लाभले असून संगीत संयोजन कमलेश भडकमकर, सोमेश नार्वेकर यांनी केले आहे. कलाकार श्रीरंग भावे, मयूर सुकाळे, पार्थ महाजन, सायली महाडिक, दिशा देसाई, अमृता मोडक, क्षितिजा जोशी, स्मयन आंबेकर यांचा या कलाकृतीत सहभाग असून सूत्रसंचालन रोहन देशमुख, कुहू दातार यांनी, तर दृष्य चित्रण रोहन गायतोंडे यांनी केले आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे.
वीर सावरकरांनी लिहिलेली नवीन गाणी स्वरबद्ध
‘साहित्यसूर्य सावरकर’ या कार्यक्रमाविषयी मंजिरी मराठे यांनी सांगितले की, २००७ साली ‘शतजन्म शोधताना’ कार्यक्रम केला. त्यामध्ये लावणी, पोवाडा, फटका अशा लोकगीतांचा समावेश होता. वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या विचारांवर आधारित तो पहिला कार्यक्रम होता. आता नव्याने सादर होणाऱ्या ‘साहित्यसूर्य सावरकर’या कार्यक्रमात वीर सावरकरांनी प्रभू रामचंद्र, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे, वाघनखं, मातृभूमी यांच्याविषयी अतिशय सुंदर लिखाण केले आहे. यावर आधारित हा कार्यक्रम आहे. यामध्ये वीर सावरकरांच्या काही नवीन स्वरबद्ध केलेल्या गाण्यांचं सादरीकरण होणार आहे. अशा पद्धतीच्या अनोख्या कार्यक्रमाचा हा पहिलाच प्रयत्न आहे.
(हेही वाचा Veer Savarkar : हिंदू म्हणून सर्वांना एकत्रित करण्याचे काम सगळ्यांनी केले पाहिजे – अभिनेता रणदीप हुडा)
‘वीर सावरकर’ चित्रपट नव्या रुपात
ज्येष्ठ संगीतकार स्वर्गीय सुधीर फडके यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेला ‘वीर सावरकर’ चित्रपट HD 4Kया नवीन तंत्रज्ञानाने नव्या पिढीसाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाचा कालावधी पावणेदोन तासांचा असून या हिंदी चित्रपटाचा विनामूल्य प्रिमियर शो सोमवारी, २६ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात प्रेक्षकांना पाहता येईल. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय पद्मश्री दादा इदाते, सचिव रवींद्र माधव साठे, आमदार सदा सरवणकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मंजिरी मराठे यांची उपस्थिती लाभणार आहे.
Join Our WhatsApp Community