- पार्थ बावस्कर
पुण्यातल्या त्या मैदानात मुंगीलाही आत शिरायला जागा नव्हती उरली, गर्दी इतकी होती की लोक एकमेकांच्या अंगावर कोसळत होते, पण निघून जात नव्हते, त्यांचे कान आसुसले होते, आसुसलेल्या कानांनी समोर बोलणाऱ्या माणसाचे शब्द ऐकून लोक धन्य होत होते, कारण समोर बोलायला उभे होते, हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) , निमित्त होतं ते लोकमान्य टिळकांच्या जयंतीचं !
सावरकर तळमळीने सांगत होते, “तुमची पिढी ही हिंदुस्थानातली विजयी पिढी आहे! तुमच्या इतिहासाचं पान हे एक सोनेरी पान आहे, हे उद्या जर तुम्हाला असंच ठेवायचं असेल आणि ते काळंकुट्ट करायचं नसेल तर सगळ्या जणांनी आपली सैन्यशक्ती कशी वाढेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आठ वर्ष तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून झाले आहेत. त्यात एक कोटी सैन्य सीमेवर उभं असायला पाहिजे होतं. पण पंचवार्षिक योजना होतात त्या मध्ये, कालवे किती, रस्ते किती बांधायचे, झाडे किती लावायची, यावर चर्चा होतात. याही गोष्टी योग्यच आहेत पण हे रस्ते तुम्ही कुणाकरिता बांधत आहात? जर तुमचं संरक्षण नसेल तर बाहेरचे लुटारू लोक वाट पाहत आहेत की तुम्ही रस्ते बांधा, झाडं लावा, लहान मुली वयात आणा, आम्ही त्याच रस्त्याने तुमच्यावर चालून येऊन, तुमच्याकडे शस्त्रबळ नसेल तर तुम्हाला लुटून जाऊ शकतो. या झाडाचं, या रस्त्याचं, या देशाचं, या स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी तुम्ही पंचवार्षिक योजना आखा. प्रत्येक पालकाने आपला मुलगा सैन्यात गेला पाहिजे हा निश्चय केला पाहिजे. प्रत्येक मुलाने आपण सैन्यात जावं हा निश्चय केला पाहिजे. ज्यांना स्वातंत्र्य हवं त्यांनी रणांगणात मारायला सिद्ध झालं पाहिजे. अद्ययावत शस्त्रास्त्र पाहिजे आहेत!’’ (Veer Savarkar)
(हेही वाचा Veer Savarkar: प्रभू रामचंद्र आणि वीर सावरकर)
“जगात एकानेही नेहरूंना वचन दिलं नाही की माझे अॅटम बॉम्ब मी बंद करीन, पण नेहरू मात्र मोठेपणाने दुस-याची प्रत्येक गोष्ट मानत आहेत. मी तुम्हाला सांगतो, अॅटम बॉम्ब तुम्ही बंद करू नका. आपण अद्ययावत झालं पाहिजे, सर्व शस्त्र इथे निर्माण झाली पाहिजेत. अहो, शस्त्रसिद्धीच्या मार्गातून जगामध्ये कधी चिरंतन शांतता नांदणार नाही. तो हिटलर पाहा, तो टोजो पाहा. ही ठराविक उदाहरणं तुमच्या शाळेतले शिक्षक तुमच्यापुढे ठेवत असतात. टोजो आणि हिटलर हे सैन्याच्या मागे लागले, आणि शक्ती वाढवून, जग पादाक्रांत करायचं म्हणून त्यांनी इर्षा धरली आणि त्यामुळे त्यांचा नाश झाला. तुम्ही जर सैन्य वाढवू लागले, अॅटम बॉम्ब, वाढवू लागले, हायड्रोजन बॉम्ब वाढवू लागले तर तुमचाही नाश होईल, म्हणून तुम्ही करा काय? तर असलेल्या बंदुकासुद्धा, चापाच्या बंदुकासुद्धा, दिवाळीचे फटके सुद्धा हे फेकून द्या आणि बुद्धाच्या जपमाळा घेऊन जपत बसा! असा निष्कर्ष हे लोक काढत आहेत. कुणाला खरोखर वाटेल की हिटलर इतका बलशाली झाला पण त्याचा शेवटी नाश केला. जपान इतका बलशाली झाला, बुद्धधर्मी असून सुद्धा, बुद्धाला मागे सारून तो बलशाली झाला, त्याने आपली शक्ती वाढवली तरी त्याचा नाश झाला. खरोखर शस्त्राने शस्त्र वाढतं, भांडणाने भांडण वाढतं, तर भांडूच नये जगात! पण मी म्हणतो जर भांडूच नये तर जिवंतच राहू नये जगात! शरण जावं जो येईल त्याला!
आताच एका सन्मान्य थोर पुरुषाने उपदेश दिला आहे की पापस्थानला संतुष्ट करण्यासाठी आपलं सैन्य कमी करा ना! या माणसाला एवढंच विचारलं पाहिजे की शस्त्र वाढवू नका आणि शांततेने चला म्हणजे तुम्ही जगाला जिंकू शकाल, किंवा तुमचं स्वातंत्र्य टिकू शकेल, तर तुम्ही आम्हाला सांगा हिटलरची शक्ती कोणत्या बळाने मारली गेली? धम्मपदाची पानं वाचली का हिटलरच्या पुढे जाऊन? गीतेतलं गीतारहस्य वाचलं का हिटलरच्या पुढे जाऊन? की शांती, शांती शांती; म्हणत सकाळ आणि संध्याकाळ जे मंत्र आमच्या ब्राह्मणांच्या घरात निनादात असतात ते शांतीमंत्र हिटलरच्या पुढे जाऊन म्हटले, किंवा त्या ख्रिस्ताचं ते माउंटवर, पर्वतावर जाऊन झालेलं प्रवचन वाचलं, त्यामुळे हिटलरचा नाश झाला का? का चरखा विणल्यामुळे हिटलरचा नाश झाला, हे तरी आम्हाला नक्की एकदा सांगा! लोकहो, हिटलरच्या बळाचा नाश कुणी केला? हिटलरपेक्षा तिप्पट बळ एकत्र करून अमेरिकेने, इंग्लंडने, फ्रांसने आणि रशियाने एकत्र मिळून हिटलरचा नाश केला. म्हणजे बळाचा नाश सबळाने केला, सबळाचा नाश सवाई बळाने केला, कमी बळाने नव्हे, हेच सिद्ध होत आहे. टोजोचा नाश कुणी केला? जापानचं बळ वाढलं, जपानने दहा दिवसांच्या आत इंग्रजी साम्राज्य होतं की नव्हतं करून टाकलं, सुभाषबाबूंची आमची सेना त्याच वेळेला तिकडे गेली आणि अत्यंत आश्चर्याची गोष्ट अशी की भारताचा पहिला भाग कोणता स्वतंत्र झाला असेल तर तो ज्या बेटावर राज्यक्रांती केल्याच्या आरोपाखाली ब्रिटीश आम्हाला नेऊन कोंडत होते ते अंदमान बेटच आहे हे ध्यानात ठेवा. सुभाषबाबूंनी जपानच्या मदतीने अंदमानची बेटं स्वतंत्र केली आणि स्वातंत्र्याचा पहिला ध्वज जपानच्या मदतीने तिथे उभारला. आता मला सांगा या इतक्या प्रबळ झालेल्या जपानचा नाश कुणी केला? तुमच्या उपदेशाने केला का? सगळं सैन्य टाकून दिलं म्हणून का अमेरिका विजयी झाली आणि जपान नाहीसं झालं? नाही! जपानने बापजन्मी कधी पहिला नव्हता असा अॅटम बॉम्ब अमेरिकेने आणला आणि त्यांच्यावर टाकून सगळी शहरं नष्ट करून टाकली, म्हणजे पुन्हा तोच सिद्धांत प्रस्थापित होतो की बळाचा नाश, शत्रूंच्या बळाचा नाश, दुष्टांच्या बळाचा नाश, हा निर्बलाने होत नाही, सबलाने होतो, सबळ शत्रूचा नाश हा सवाई बळाने होतो.’’
सावरकरांनी (Veer Savarkar) सांगितलेला हा एकेक शब्द म्हणजे राष्ट्रमंत्र वाटतो मला. जगातल्या प्रत्येक देशाची संरक्षण नीती कशी असावी याबद्दल सांगितलेला हा एक मूलगामी सिद्धांत आहे. तेव्हाच्या भारतीय नेतृत्वाने हा सिद्धांत मानला नाही, परिणाम असा झाला की भारताने पहिले युद्ध गमावले, निर्णायक भूमी शत्रूच्या ताब्यात गेली. सावरकरांचा हा शस्त्रास्त्रांच्या बाबतीतला सल्ला आता तरी विसरायला नको, तो आचरणात आणणे हेच आपल्या भल्याचे !
(लेखक व्याख्याते आणि इतिहास अभ्यासक आहेत.)
Join Our WhatsApp Community