भायखळा येथील वीरमाताा जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीबागेतील मोठ्या प्राण्यांचे तसेच पक्ष्यांचे प्रदर्शनी पिंजऱ्यांचे काम पूर्ण होत आल्यानंतर, आता येथील माकड प्रदर्शन सुविधा तसेच मगर आणि सुसर यांच्या प्रदर्शनी पिंजऱ्यांचे काम हाती घेण्यात येत आहे. या पिंजऱ्यांचे काम लवकरच हाती घेऊन पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांना राणीबागेतील प्राण्या, पक्ष्यांना जवळून न्याहाळता येणार आहे.
सुशोभीकरणाचे काम हाती
राणीबागेच्या नुतनीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेऊन बागेचे सुशोभीकरण केले जात आहे. आतापर्यंत काही पिंजऱ्यांचे काम पूर्ण होऊन त्यामध्ये प्राण्यांना नैसर्गिक सहवास घडवला जात आहे. तर काही पिंजऱ्यांचे बांधकाम शेवटच्या टप्प्यात आहे. आता येथीलच मोठ्या प्राण्यांसाठी रुग्णालय, सुरक्षा चौकी, संरक्षक भिंत, सेवा रस्ते व पदपथ, पक्षी विलगीकरण कक्ष, माकड प्रदर्शन सुविधा, पाण्याच्या पृष्ठभागाखाली पाहण्यासाठी सुविधा असलेल्या गॅलरी समवेत, मगर व सुसर यांचे प्रदर्शनी पिंजरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचाः मुंबईतील ‘तो’ हिमालय पुन्हा उभा राहणार… होणार साडेसात कोटींचा खर्च!)
६० कोटींचा खर्च
मगर आणि सुरस यांची निवासस्थाने बांधून प्रदर्शनी गॅलरी तयार करण्यात येणार आहे. यामध्ये अॅक्रीलिक ग्लास, जीवन समर्थन प्रणाली आणि कृत्रिम दगड आदी कामांचा समावेश आहे. यासाठी स्काय वे इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी ६० कोटी ६२ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. हे काम पावसाळ्यासह १८ महिन्यांमध्ये पूर्ण करणे अपेक्षित आहे.
ठराविक कंपन्यांसाठीच कामे?
यापूर्वी या कंत्राटदाराने राणीबागेमधील वाघ, सिंह, सांबर, हरीण, नील गाय, चार शिंगी हरीण, काळवीट, बार्कींग हरीण (भेकरा) व पक्ष्यांचा पिंजरा आदींची कामे केलेली आहेत. राणीबागेच्या नुतनीकरणाचे काम हाती घेत महापालिकेने प्रथम पेंग्विन कक्षाचे काम हाती घेतले. या पेंग्विन कक्षाचे काम हाय वे कंट्रक्शन कंपनीला बहाल करण्यात आले. त्यानंतर येथील अन्य प्रकारची कामे स्काय वे कंस्ट्रक्शन व डि.बी. इन्फ्रा या कंपन्यांकडे आहेत. त्यानंतर पिंजऱ्यांची कामेही या सर्व कंपन्यांनी संगनमत करुन घेतली होती. त्यामुळे राणीबागेत या तीनच कंपन्या सर्व प्रकारची कामे मिळवत असतात. याठिकाणी झाडांच्या फांद्या छाटणीसाठी बाहेरच्या कंत्राटदारांचा शिरकाव होऊ नये, म्हणून प्रशासनाने कंपन्यांशी संगनमत करुन अशाप्रकारच्या अटींचा समावेश करुन त्यांना काम देण्याचा प्रयत्न झाला होता. आताही पुन्हा पिंजऱ्यांसह इतर कामांसाठी पुन्हा स्काय वे हीच कंपनी पात्र ठरल्याने, काही ठराविक कंपन्यांसाठीच ही कामे केली जातात का, असा प्रश्न आता पडू लागला आहे.
(हेही वाचाः राणीबागेतील पर्यटकांनी गाठला ४६००चा आकडा)
Join Our WhatsApp Community