Mumbai News : नर्सने १२ दिवसांच्या बाळाच्या तोंडाला लावली चिकटपट्टी, गुन्हा दाखल

८ महिन्यांपूर्वी स्थानिक नगरसेविकेने या घटनेच्या विरोधात रुग्णालयाबाहेर आंदोलन करून रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांना यासंदर्भात निवेदन दिले होते.

276
Mumbai News : नर्सने १२ दिवसांच्या बाळाच्या तोंडाला लावली चिकटपट्टी, गुन्हा दाखल

बारा दिवसांच्या मुलाच्या तोंडाला चक्क चिकटपट्टी लावणाऱ्या मुंबई महानगरपालिकेतील (BMC) तीन परिचारिका (Nurse) यांच्या विरोधात ८ महिन्यांनंतर भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ८ महिन्यांपूर्वी स्थानिक नगरसेविकेने या घटनेच्या विरोधात रुग्णालयाबाहेर आंदोलन करून रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांना यासंदर्भात निवेदन दिले होते. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे राहणाऱ्या प्रिया कांबळे यांचे भांडुप येथे माहेर आहे. प्रिया कांबळे या गर्भवती असताना माहेरी आलेल्या होत्या. २० मे २०२३ मध्ये भांडुप येथील सावित्रीबाई फुले रुग्णालयात प्रसूत झाल्या व त्यांनी मुलाला जन्म दिला. प्रसूतीनंतर तीन दिवसांनी प्रिया कांबळे आणि तिच्या बाळाला रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले होते, डिस्चार्ज देताना बाळ पिवळे पडू लागले किंवा काही त्रास झाल्यावर रुग्णालयात आणण्याची सूचना डॉक्टरांनी दिली होती. (Mumbai News)

बाळाला त्रास सुरू झाल्याने मुलाची आई प्रिया कांबळे या पुन्हा त्याला रुग्णालयात घेऊन आल्या, दरम्यान १२ दिवसांच्या मुलाला डॉक्टरांनी आयसीयूमध्ये दाखल करून घेतले होते. प्रिया कांबळे मुलाला दूध पाजण्यासाठी आयसीयूत गेल्या असता मुलाला तोंडापासून गालापर्यंत चिकटपट्टी लावलेली होती व मध्येच मुलाच्या तोंडात चोखणी देण्यात आली होती. प्रिया कांबळे यांनी परिचारिकांना (Nurse) याबाबत विचारले असता बाळ खूप रडत होते म्हणून चिकटपट्टी लावली त्यात काय झाले असे उत्तर दिले. प्रिया कांबळे यांनी ही बाब पतीला सांगितली व मुलाला डिस्चार्ज मागितला परंतु प्रसूतीगृहाने डिस्चार्ज देण्यास नकार दिला. (Mumbai News)

(हेही वाचा – City Civil Court : मुंबईच्या सिटी सिव्हिल कोर्ट केससाठी योग्य वकील कसा निवडायचा?)

अखेर कांबळे कुटुंबाने स्थानिक माजी नगरसेविका जागृती पाटील यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पाटील या दुसऱ्या दिवशी प्रसूतिगृहात आल्या व त्यांनी याबाबत डॉक्टरांना जाब विचारून बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन खाजगी रुग्णालयात बाळाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान जागृती पाटील यांनी प्रसूतिगृहावर मोर्चा काढून मनपा प्रशासन आणि भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. तसेच वकील तुषार भोसले यांनी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली. हा सर्व घटनाक्रम २ मे ते ६ मे २०२३ घडला होता, माजी नगरसेविका जागृती पाटील यांनी पोलिसांना दिलेली तक्रार गृहीत धरून कांबळे कुटुंब तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले नव्हते. अखेर कांबळे कुटुंब गेल्या आठवड्यात भांडुप पोलीस ठाण्यात गेले व रुग्णालयातील तीन परिचारिका (Nurse) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. भांडुप पोलिसांनी ३ पारिचरिका यांच्यावर गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. (Mumbai News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.