महाराष्ट्र बेचिराख करू, अशी भाषा करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी (Manoj Jarange Patil) सरकारने आतापर्यंत घेतलेली भूमिका सर्वसमावेशक असली पाहिजे. आंदोलकांची बाजू समजून घेतली पाहिजे, पण ही भाषा भयंकर आहे. कोणता कट रचला गेला होता का, हेच दिसते. महाराष्ट बेचिराख करण्याची भाषा करणारे कुणी करत असले तर त्याचे विरोधकही समर्थन करणार नाही. यामागे काय योजना होती का? कुणी व्यक्ती यामागे आहे का? काय कट कारस्थान रचले होते का? याप्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याची एसआयटीद्वारे चौकशी करा, असा आदेश सरकारला दिला
मराठा समाजाचीही बदनामी होत आहे
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यावर मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपचे आमदार आक्रमक झाले त्यावेळी आमदार आशिष शेलार म्हणाले, यामुळे मराठा समाजाचीही बदनामी होत आहे. आम्ही लाखोंचे मोर्चे शिस्तबद्धपणे काढले, पण त्यालाही गालबोट लागत आहे. जरांगे पाटलांचा आम्ही आदर करतोच, पण ही भाषा बरोबर नाही. फडणवीस यांचे व्यक्तिमत्व सगळे महाराष्ट्र जाणतो. त्यांची भाषा कधीच घसरत नाही. पण त्यांचा एकेरी उल्लेख केला गेला. मुख्यमंत्र्यांनाही म्हणाले, तुम्हाला शेवटची संधी असे म्हणाले. विरोधी पक्षही त्याचे समर्थन करणार नाही. काळ सोकावतो आहे. महाराष्ट्र बेचिराख करण्याची योजना कुणी केली होती? संपवून टाकू, निपटवून टाकू, अशी धमकी देण्यासाठी बळ कुणी दिले? देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याच्या आदल्या दिवशी उबाठाचे म्हणतात, भाजपाला एक दिवसात संपवू आणि दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील म्हणाले, निपटवून टाकू. या दोन्ही वक्तव्यांचा काय संबंध आहे?, असे आमदार आशिष शेलार म्हणाले.
कुणाच्या कारखान्यात बैठका झाल्या
पंतप्रधान मोदी यांची सभा आहे, त्यांनाही म्हणतात, महाराष्ट्रात येऊ देणार नाही. कोण तुम्ही? याची गंभीर नोंद घेतली पाहिजे. पंतप्रधान यांच्या विरोधात कटकारस्थान रचले जात आहे. एका व्यक्तीला कुणी सगळ्या समाजाचे नेतृत्व दिले नाही. जरांगे पाटील कुठे राहतात ते शोधा, कुणाच्या कारखान्यात बैठका झाल्या, कुणाच्या कारखान्यातून जेसीबी आले? त्या कारखान्यात दगड कुठून आले? जर हा कारखाना राष्ट्रवादीच्या आमदाराचा असेल तर एसआयटी लावा आणि कालबद्धपणे या षड्यंत्राची चौकशी करा, असे आमदार आशिष शेलार म्हणाले.
Join Our WhatsApp Community