महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, (२६ फेब्रुवारी) सुरू झाले. मंगळवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर होत असलेल्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
टीकेवर पलटवार करताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते टीका करत आहेत. आम्ही त्यांना आमच्या कामाने उत्तर देऊ. राज्यातील सर्वांना न्याय देणारा, सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प सरकारने मांडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत संकल्पनेला पूरक असा अर्थसंकल्प सरकारने मांडळा आहे. यामध्ये दुर्बल घटक, महिला शेतकरी, कामगार, तरुण आणि ज्येष्ठांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. जे राज्य पायाभूत सुविधांसाठी पुढे असते, त्या राज्याची मोठ्या प्रमाणात प्रगती होते. त्यामुळेच राज्यातील पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे, ‘ अशी माहिती शिंदेंनी दिली आहे.
मराठा समाजाबाबत सरकारची भूमिका अगदी स्पष्ट
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठी आरक्षणावरही भाष्य केले. ते म्हणाले की, ‘सरकारने मराठी समाजासाठी कायद्याच्या चौकटीत बसणारे १० टक्के आरक्षण दिले आहे. मराठा समाजाबाबत सरकारची भूमिका अगदी स्पष्ट आहे. समाजासाठी ज्या सुविधा हव्या आहेत. त्या सुविधा सरकारने दिल्या आहेत. समाजाने आतापर्यंत ज्यांना ज्यांना संधी दिली, त्यांनी समाजाला न्याय दिला नाही. समाजाच्या जीवावर अनेक जण मोठे झाले, पण समाज मात्र वंचित राहिला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच त्यांनी पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिले. दुर्दैवाने ते सुप्रीम कोर्टात टिकले नाही, पण आता आम्ही सर्व त्रुटी दूर करून टिकणारे आरक्षण दिले आहे. सुप्रीम कोर्टाने ज्या ज्या त्रुटी सांगितल्या, त्या सर्व सरकारने दूर केल्या आहेत. त्यामुळे मला वाटते की, आता कुणीही आंदोलन करण्याची गरज नाही’, असेही शिंदे यावेळी म्हणाले.
राज्यातील नागरिकांना फायदा होईल, असा अर्थसंकल्प …
या अर्थसंकल्पात विविध योजनांना प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांसाठी जलसंपदा विभागात मोठी तरतूद काढण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त भागासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद आहे. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, लेक लाडकी, लखपती दीदी, बचत गट सक्षमीकरण विविध योजनांना प्राधान्य दिले आहे. राज्यातील तीर्थस्थळे, किल्ले, पर्यटन स्थळे यांच्या विकासासाठी वेगळी तरतूद आहे. सर्व घटनांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना नक्कीच फायदा होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community