स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांनी ज्या वास्तूमध्ये सशस्त्र क्रांतीची ज्योत पेटवली, ती नाशिक येथील अभिनव भारत संघटनेच्या कार्यालयाची वास्तू ऐतिहासिक होती. मात्र सरकारने नुतनीकरणासाठी ही वास्तू पाडली आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनीच ही वास्तू पाडण्यात आली. यामुळे सावरकर प्रेमींकडून याबाबत हळहळ व्यक्त होत आहे. राज्य सरकारने अशा प्रकारच्या इतिहास पुरुषांच्या संबंधी वास्तूंविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्या वारसांना विश्वासात घ्यायला हवे, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर म्हणाले.
(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या व्यासपिठावर ओवैसीची भाषा; विनोद शेलार यांची पोस्ट व्हायरल)
नाशिक शहरातील दुर्गा मंगल कार्यालयाजवळ तीळभांडेश्वर लेन येथील वाड्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांनी अभिनव भारत चळवळ उभी केली होती. 1899 ते 1909 या कालावधीत या वाड्यात अभिनव भारतच्या माध्यमातून ब्रिटिशांविरोधात रणनीती आखली जायची. स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी तरुणांचे संघटन निर्माण केले जात होते. जेव्हा वीर सावरकर यांना अटक करण्यात आली. तेव्हा मात्र येथील वाड्यातील कार्य काहीसे थंडावले होते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचा जिवंत साक्षीदार असलेल्या या वाड्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले. या ठिकाणी भाडेकरू रहात होते. आता याचे अभिनव भारत हे स्मारक तयार करण्यासाठी सुमारे 6 कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. त्यामुळे हा वाडा पाडण्यात आला. सरकारच्या म्हणण्यानुसार या वाड्यात अंदमान येथील काळकोठडीची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. तसेच वीर सावरकरांच्या जीवनावरील लघुपट, साहित्य आणि सावरकरांच्या जीवनावरील प्रश्नांना उत्तरे देणारा रोबोट अशा अनेक प्रकारच्या कल्पना साकारण्यात येणार आहे.
क्रांतिकारकांची स्मारके वारसांच्या ताब्यात द्या – रणजित सावरकर
सरकारच्या या निर्णयाची आम्हाला काहीही कल्पना नव्हती. हा वाडा उभारण्यासाठी वीर सावरकर (Veer Savarkar) यांनी देशभर भाषणे करून निधी जमा केला होता. त्यांनी जेव्हा याची विश्वस्त संस्था स्थापन केली, तेव्हा त्यांनी त्यात अट घातली होती की, या ट्रस्टवर क्रांतिकारकांचे जे वंशज आहेत, त्यांनीच यावर विश्वस्त म्हणून रहावे. या वाड्यासाठी शासनाला मदत करायची असेल, तर करावी, पण परस्पर निर्णय घेणे चुकीचे आहे. जी जुनी वास्तू आता पाडली, त्याची डागडुजी झाली असती की नाही, हे कुणी ठरवले? याविषयी वीर सावरकर यांच्या वंशजांना विचारण्याची गरज वाटली नाही का? हे चुकीचे आहे. अशा प्रकारची क्रांतिकारकांची स्मारके ही त्यांच्या वारसांच्या ताब्यात दिली पाहिजे, ते त्या स्मारकांची उत्तम देखभाल करू शकतात, असे रणजित सावरकर (Ranjit Savarkar) म्हणाले.
नवीन वस्तू बनवली, तर त्याच्या देखभालीची जबाबदारी वीर सावरकरांच्या वंशजांकडे द्यावी – असिलता राजे-सावरकर
नाशिक येथील अभिनव भारत संघटनेचे कार्यालय पडताना निदान वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या वंशजांना विश्वासात घेतले पाहिजे होते. आता या ठिकाणी नवीन वास्तू उभारण्यात येईल. तेव्हा तरी त्यांची उत्तम देखभाल व्हावी. त्यासाठी याची जबाबदारी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडे देण्यात यावी. भगूर येथील वीर सावरकर स्मारकाची जबाबदारीही सावरकर स्मारकाकडेच आहे. त्यामुळे या ठिकाणी कायम नवनवीन उपक्रम राबवले जातील, वीर सावरकर यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार होईल, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या विश्वस्त, वीर सावरकर यांच्या नात असिलता राजे (Asilata Raje) म्हणाल्या.
ही वास्तू पडण्यापूर्वी सावरकर कुटुंबियांपैकी कुणालाही कळवले नाही – वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर
नुकतेच नाशिकमधील अभिनव भारत मंदिर येथे भूमीपूजन झाल्याची बातमी आली आणि त्याबरोबरच तो वाडा पाडल्याची छायाचित्रे पाहण्यात आली. तिथे अभिनव भारत मंदिरचे पुनर्निर्माण होणार आहे, अशी ओझरती बातमी कानांवर आली आहे. हे सर्व घडत असताना सावरकर (Veer Savarkar) कुटुंबियांपैकी कुणालाही याची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. अभिनव भारत मंदिर नाशिकमध्ये स्थित आहे आणि तिथे जाण्याचे रस्ते हे खूप छोटे आहेत. पूर्वी हे ठिकाण नाशिक दर्शनमध्ये होते, पण ते वगळले गेल्याची बातमी देखील आली आहे. शिवाय अभिनव भारत मंदिरचे सभागृह हे दोन वाड्यांच्या मधोमध अत्यंत धोकादायक परिस्थितीत उभे होते. आता ते पाडून झाल्यावर अनेक ठिकाणी वासे बाहेर आल्याचे निदर्शनास येत आहे. अशा परिस्थितीत हे नवीन बांधकाम जर करायचे असेल तर त्याचा आराखडा कसा असेल? त्या जागेवर अभिनव भारत मंदिर व्यतिरिक्त अन्य काही उभे राहणार आहे जसे की सदनिका किंवा दुकाने, तसेच अभिनव भारत मंदिरचा प्रवेश कुठून असेल? याबाबत सावरकर कुटुंबियांना काहीही कळवले गेले नाही. माझी पुरातत्व विभाग, पर्यटन विभाग यांच्या मंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी वैयक्तिक रितीने यात लक्ष घालावे आणि त्या जागेवर पुन्हा एकदा केवळ अभिनव भारत मंदिर हेच उभे रहावे. अन्य कुठलीही सदनिका किंवा दुकाने तिथे नकोत. शिवाय हे नवीन बांधकाम झाल्यानंतर त्याचा समावेश नाशिक दर्शनमध्ये करण्यात यावा, ज्यायोगे लोकांना अभिनव भारत मंदिराचा इतिहास माहिती होईल, असे वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर (Satyaki Savarkar) म्हणाले.
वंशजांचा सन्मान राखला जाईल – आमदार देवयानी फरांदे
“नाशिक एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी दिवंगत सुर्यकांत रहाळकर यांनी मला पत्र दिले होते. त्यात त्यांनी अभिनव भारत कार्यालय वास्तूच्या पुनर्बांधणीची मागणी केली होती. कारण जुनी वास्तू मातीची होती आणि अत्यंत जीर्ण अवस्थेत, मोडकळीस आली होती. त्यामुळे आता ती उत्तम वास्तूरचानाकाराकडून आराखडा तयार करून पुनर्बांधणी करू. शासनाकडून या कामासाठी सहा कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे,” अशी माहिती भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिली.
तसेच फरांदे पुढे म्हणाल्या की, “नवीन वास्तू झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वंशजांनाही बोलवून त्यांचा मान-सन्मान केला जाईल.” रहाळकर यांचे दोन महिन्यापूर्वी निधन झाल्याची माहिती फरांदे यांनी दिली. (Veer Savarkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community