मराठा आरक्षण आंदोलनात काही चुकीच्या गोष्टी घडल्या, विशेषतः मनोज जरांगे पाटील यांची शिवराळ आणि धमकीची भाषा, आंदोलनात झालेली हिंसा इत्यादी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. आता या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जातीवाचक टीका करण्यात आली. याचीही गंभीर दखल सरकारने घेतली आहे. फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल योगेश सावंत (Yogesh Sawant) यांना अटक केली आहे. मात्र योगेश सावंत याच्याशी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहीत पवार (Rohit Pawar) हे संपर्कात आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली. त्यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केले.
भाजप आमदार राम कदम यांनी विधानसभेत केलेल्या आरोपानंतर विधानसभा अध्यक्षांकडून हे आदेश देण्यात आले आहेत. दोन समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला सोडून देण्यासाठी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोलिसांवर दबाव आणला असा आरोप आहे. या प्रकरणात आता विधानसभा अध्यक्षांकडून रोहित पवार यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
काय आहे राम कदम यांचा आरोप?
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात वाईट पोस्ट फिरत आहे. ही पोस्ट योगेश सावंत (Yogesh Sawant) नावाचा व्यक्तीने सोशल मीडियात व्हायरल केली आहे. त्याचे बारामती कनेक्शन आहे. त्याला अटक देखील करण्यात आली. मात्र त्याला अटक केल्यानंतर रोहित पवार (Rohit Pawar) पोलीस ठाण्याला फोन करतात आणि त्याला सोडून द्या असे सांगतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल देखील या व्यक्तीने अपशब्द वापरले, असा आरोप राम कदम यांनी केला आहे. दरम्यान राम कदम यांच्या आरोपानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रोहित पवार यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community