5-जी तंत्रज्ञान आणि कोविड-19चा फैलाव… अफवांबाबत दूरसंवाद विभागाचे स्पष्टीकरण!

याविषयी पसरणाऱ्या अफवा आणि खोट्या माहितीमुळे फसगत करुन घेऊ नये, असे आवाहन जनतेला करण्यात येत आहे.

159

5-जी तंत्रज्ञानाच्या मोबाईल टॉवर्सच्या चाचण्यांमुळे कोरोना विषाणूची दुसरी लाट येत आहे, असे दावे करुन दिशाभूल करणारे अनेक संदेश विविध समाज माध्यमांतून व्हायरल होत असल्याचे दूरसंवाद विभागाच्या लक्षात आले आहे. दूरसंवाद विभागाने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार, हे संदेश खोटे असून, त्यात अजिबात तथ्य नाही. 5-जी तंत्रज्ञान आणि कोविड-19चा फैलाव यामध्ये कोणताही संबंध नसल्याचे सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी सांगण्यात येत आहे, असे त्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. याविषयी पसरणाऱ्या अफवा आणि खोट्या माहितीमुळे फसगत करुन घेऊ नये, असे आवाहन जनतेला करण्यात येत आहे.

तो दावा बिनबुडाचा

5-जी तंत्रज्ञान आणि कोविड-19 साथीचा संबंध जोडणारे दावे पूर्णपणे खोटे असून, त्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. त्याशिवाय, अद्याप भारतात कोठेही 5-जी नेटवर्कच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या नसल्याची माहितीही देण्यात येत आहे. अर्थात, 5-जी तंत्रज्ञानाच्या चाचण्या किंवा त्याच्या नेटवर्कमुळे भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा दावा बिनबुडाचा आणि असत्य आहे.

(हेही वाचाः म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर होणार आता मोफत उपचार! काय म्हणाले टोपे?)

दूरसंवाद विभागाचे स्पष्टीकरण

आयनीकरण न करणाऱ्या वारंवारतांच्या रेडिओ लहरी, मोबाईलच्या मनोऱ्यांवरुन उत्सर्जित होतात. त्यांच्यात अगदी सूक्ष्म विद्युतशक्ती असते आणि मानवासह कोणत्याही सजीवाच्या पेशींवर त्या कोणताही परिणाम करू शकत नाहीत. रेडिओ लहरींच्या संपर्कात येण्याच्या मर्यादांसंबंधीचे नियम दूरसंवाद विभागाने आखून दिले आहेत. या लहरींपासून संरक्षण देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय आयोगाने घालून दिलेल्या व जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलेल्या सुरक्षा मर्यादांच्या तुलनेत हे नियम दहापटीने अधिक कठोर आहेत.

शंकांचे निवारण करण्यासाठी दूरसंवाद विभागाचे उपक्रम

मोबाइलला टॉवरकडून होणाऱ्या लहरींच्या उत्सर्जनामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत सर्वसामान्य जनतेच्या मनातील शंका आणि भयाचे निवारण करण्यासाठी दूरसंवाद विभागाने विविध पावले उचलली आहेत. देशव्यापी जनजागृती कार्यक्रम, पत्रकांचे वितरण, विभागाच्या संकेतस्थळावर सविस्तर माहितीचे प्रकाशन, वृत्तपत्रांमध्ये जाहिराती, ‘तरंग संचार’ संकेतस्थळाचा प्रारंभ इत्यादी उपायांचा यात समावेश आहे. तसेच दूरसंवाद विभागाच्या क्षेत्रीय पथकांमार्फत वेळोवेळी जनजागरण कार्यक्रम केले जातात, जेणेकरुन अधिकाधिक लोकांना त्याविषयीची शास्त्रशुद्ध माहिती मिळावी.

(हेही वाचाः पुण्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड! २१ इंजेक्शन जप्त! )

दूरसंचार सेवा पुरवठादारांकडून या नियमांचे काटेकोर पालन करुन घेण्यासाठी दूरसंवाद विभागाकडे एक प्रणाली आहे. मात्र, एखाद्या मोबाइल टॉवरकडून सुरक्षा मर्यादांपलीकडे रेडिओ लहरी उत्सर्जित होत आहेत, अशी कोणत्याही नागरिकाची तक्रार असल्यास, तपासणीची विनंती तरंग संचार संकेतस्थळावर पाठविता येईल. त्यासाठीची लिंक- https://tarangsanchar.gov.in/emfportal

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.