संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) 5 मार्च 24 रोजी गोवा येथे नौदल युद्ध महाविद्यालयाच्या नवीन अत्याधुनिक प्रशासन आणि प्रशिक्षण इमारतीचे उद्घाटन करतील. चोला राजवटीतील पराक्रमी सागरी साम्राज्याच्या स्मरणार्थ या आधुनिक इमारतीला ‘चोला’ असे नाव देण्यात आले आहे.
नौदल युद्ध महाविद्यालयाचा इतिहास
भारतीय नौदलाच्या मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना प्रगत व्यावसायिक लष्करी शिक्षण देण्यासाठी 1988 मध्ये आयएनएस करंजा येथे नौदल युद्ध महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. 2010 मध्ये या महाविद्यालयाचे नौदल युद्ध महाविद्यालय असे नामकरण करण्यात आले आणि 2011 मध्ये गोव्यातील सध्याच्या ठिकाणी ते हलवण्यात आले. उच्च दर्जाच्या लष्करी शिक्षणासाठी एक प्रख्यात प्रतिष्ठित संस्था या दृष्टीकोनातून, सशस्त्र दलाच्या अधिका-यांना धोरणात्मक आणि परिचालन स्तरावर नेतृत्वासाठी तयार करणे हे महाविद्यालयाचे उद्दिष्ट आहे. महाविद्यालय सागरी सुरक्षा अभ्यासक्रम देखील आयोजित करते, ज्यामध्ये आपल्या सागरी शेजारी देशाचे संरक्षण दल अधिकारी देखील सहभागी होतात आणि एका मुक्त, सुरक्षित आणि सर्वसमावेशक हिंद महासागर क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य करतात , ज्यातून आपल्या पंतप्रधानांचा ‘सागर’ दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो. नौदल युद्ध महाविद्यालय हे भारतीय नौदलाच्या युद्धकला आणि आर्क्टिक अभ्यासाचे उत्कृष्टता केंद्रदेखील आहे.
(हेही वाचा – GST Return Scam: १७५ कोटींचा जीएसटी परतावा घोटाळा, जीएसटी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल)
‘चोला’ इमारत
शैक्षणिक सूचना, संशोधन आणि युद्ध खेळाशी संबंधित नौदल युद्ध महाविद्यालयाची ही इमारत चोल राजवटीच्या सागरी पराक्रमाने प्रेरित आहे. इमारतीच्या मध्यवर्ती भागामध्ये एक भित्तिचित्र कोरले आहे जे इ . स . 1025 मधील हिंद महासागरातील राजेंद्र चोलाच्या श्रीविजय साम्राज्याच्या मोहिमेचे चित्रण आहे. इमारतीचे नाव भूतकाळातील भारताचा सागरी प्रभाव आणि वर्तमानात सागरी शक्ती म्हणून त्याचे पुनरुत्थान प्रदर्शित करून भूतकाळाला वर्तमानाशी जोडते.
जलमेव यस्य, बलमेव तस्य
ही इमारत GRIHA-III च्या निकषांनुसार बांधण्यात आली आहे. इमारतीच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये पर्यावरण विकास उपक्रमांसाठी उत्खनन केलेल्या मातीचा बांधकामात वापर; 10 लाख लिटरपेक्षा जास्त पावसाचे पाणी साठवण्याची क्षमता; 100KW सौर ऊर्जा निर्मिती; आणि हरित इमारत मानके यांचा समावेश आहे. टिकाऊपणा आणि ऊर्जा कार्यक्षमतेचे पैलू इमारतीच्या रचना अभियांत्रिकी तत्त्वज्ञानाचा गाभा आहेत, आणि 100 वर्ष जुन्या वटवृक्षाला मुळापासून उपटून न टाकता त्याच्या सभोवती इमारत बांधली आहे. प्रतिकात्मकपणे, या इमारतीमागे रेस मॅगोस येथील पोर्तुगीजांचा वसाहतवादी किल्ला झाकोळला जातो. याचे हे योग्य स्थान वसाहतवादी भूतकाळातील अवशेष झटकून टाकण्याच्या भारताच्या संकल्पाचे प्रतीक आहे. तसेच , ते भविष्यातील लष्करी नेत्यांना ‘जलमेव यस्य, बलमेव तस्य’ (ज्याचे समुद्रावर नियंत्रण तो सर्वात शक्तीशाली ) या म्हणीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या निःसंदिग्ध विश्वासाच्या निरंतर मूल्याची आठवण करून देईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community