BMC Ashray Yojana : देवनार येथील सफाई कामगारांच्या बैठ्या चाळींच्या जागी आता कब्रस्तान

महापालिकेच्या सफाई कामगारांच्या घरांचा पुनर्विकास दोन वर्षे रखडला

837
BMC : महापालिकेत अनुभवी अभियंत्यांची फळी निवृत्त, कोस्टलच्या प्रमुख अभियंत्यावर रस्त्याचा भार
  • सचिन धानजी,मुंबई

पूर्व उपनगरातील देवनार संक्रमण शिबिर (एम/पूर्व) व बामणवाडी, सिंधी सोसायटी (एम/पश्चिम) विभागातील महापालिका सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासाठी कंत्राटदारांची नेमणूक केल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी प्रत्यक्षात या प्रकल्पाला सुरुवात होण्याऐवजी या बांधकामाची जागाच बदलण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. देवनार येथील ८ बैठ्या चाळी धोकादायक बनल्या आहेत. पुनर्विकासासाठी तोडण्यात येणाऱ्या चाळींच्या जागी पुन्हा सफाई कामगारांची घरे होणार नसून याठिकाणी मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान उभारले जाणार आहे. त्यामुळे या सफाई कामगारांची घरे एम पूर्व महापालिका विभाग कार्यालयाच्या जवळील मोकळ्या जागेत बांधली जाणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. (BMC Ashray Yojana)

मुंबई महापालिकेच्यावतीने सफाई कामगारांच्या सेवा सदनिकांचा विकास आश्रय योजनेतंर्गत हाती घेण्यात आला असून पूर्व उपनगरातील देवनार संक्रमण शिबिर (एम/पूर्व) व बामणवाडी, सिंधी सोसायटी (एम/पश्चिम) विभागातील सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली होती. या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी ऑक्टोबर २०२१ मध्ये कंत्राटदाराची नेमणूक केलेली आहे. या प्रकल्पाच्या कामांसाठी महापालिकेने किंजल सिव्हिलकॉन एल एल पी यांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी सुमारे २०८ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली होती. (BMC Ashray Yojana)

पुनर्विकास करण्यात येणाऱ्या देवनार संक्रमण शिबिर येथील भूमापन क्र १/९/१ या भूखंडावर घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांच्या ८ बैठ्या चाळी अस्तित्वात आहेत. या चाळी मोडकळीस आलेल्या असल्याने त्यांचा पुनर्विकास आश्रय योजनेच्या गट-९ अंतर्गत करण्याचा निर्णय घेतला. परंतु सफाई कामगारांच्या या चाळींच्या जागी नव्याने बांधकाम करण्यास परवानगी मिळत नसून प्रत्यक्षात या चाळींच्या जागी पुन्हा सफाई कामगारांच्या घरांऐवजी चक्क मुस्लिम समाजातील लोकांसाठी दफनभूमी अर्थात कब्रस्तान उभारले जात असल्याची माहिती समोर आली आहे. (BMC Ashray Yojana)

(हेही वाचा – Supreme Court : ‘नोट के बदल वोट’ आणि ‘नोट के बदल भाषण’ म्हणणारे आमदार, खासदारावर चालणार खटला)

वसाहतींचा पुनर्विकास हा महानगरपालिकेचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प

महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोव्हिड-१९ अर्थात कोरोना दरम्यान मुस्लिम कब्रस्तानसाठी जागा कमी पडत असल्याने ही जागा मुस्लिम कब्रस्तानसाठी आरक्षित ठेवण्याकरिता जनहित याचिका सन २०२१ मध्ये दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने निर्देश देताना, महापालिकेमार्फत सफाई कामगारांची वसाहत असलेला हा भूखंड मुस्लिम कब्रस्तानकरता राखीव करण्यात यावे. त्यानुसार विकास आराखडा-२०३४ मध्ये हा भूखंड मुस्लिम कब्रस्तानासाठी (स्मशानभूमी) प्रस्तावित केला आहे. त्यामुळे या भूखंडावरील आश्रय योजनेचे काम प्रलंबित राहिले आहे. (BMC Ashray Yojana)

आश्रय योजनेअंतर्गत सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास हा महानगरपालिकेचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. सफाई कामगारांच्या सेवानिवास्थानाच्या पुनर्विकास प्रकल्पास अत्यावश्यक नागरी सेवा प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे देवनार संक्रमण शिबिरांच्या या भूखंडावरील सेवासदनिकामध्ये राहणाऱ्या कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास राबविण्याकरिता महानगरपालिकेच्या ताब्यातील जवळपास उपलब्ध असलेल्या पर्यायी भूखंडांची चाचपणी करण्यात आली. त्यानुसार महापालिका वसाहतींसाठी राखीव असलेल्या मालमत्ता विभागाच्या ताब्यातील देवनार येथील एम/पूर्व विभाग कार्यालयासमोरील भूखंडापैकी ३६०० चौ. मी. क्षेत्रफळाच्या जागेवर सदर पुनर्विकास राबविणे शक्य असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार या नव्या भूखंडावर आश्रय योजनेतंर्गत पुनर्विकास प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. केवळ भूखंडाची अदलाबदल करण्यात येत असून यामध्ये कंत्राट किंमतीत बदल होणार नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सफाई कामगारांच्या जागेवर कब्रस्तान होणार असल्याने जो पुनर्विकास दोन वर्षांमध्ये होणे आवश्यक होते, तो प्रकल्प आता दोन वर्षे लांबणीवर पडला आहे. (BMC Ashray Yojana)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.