देशातील कोरोना स्थितीबाबत सामान्य माणसाची हेतूतः दिशाभूल करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाकडून सुरु आहे. अशा प्रयत्नांमुळे कोविड योद्ध्यांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाने आपल्या वर्तनाबाबत आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिला आहे.
कोरोना स्थितीबाबत सामान्य जनतेची दिशाभूल केली जाते!
काँग्रेसकडून अलीकडेच कोरोना स्थिती हाताळणीबाबत मोदी सरकारवर टीका केली होती. या टीकेला उत्तर देण्यासाठी नड्डा यांनी गांधी यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात नड्डा यांनी काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या टीकेचा समाचार घेतला आहे. तसेच काँग्रेस नेत्यांच्या दुटप्पीपणावरही प्रकाशझोत टाकला आहे. नड्डा यांनी या पत्रात म्हटले आहे की, आपला देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या धैर्याने सामना करतो आहे. आरोग्य व अन्य क्षेत्रातील कोविड योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता अखंडपणे या संकटाचा मुकाबला करीत आहेत. मात्र आपल्या पक्षाची काही जबाबदार मंडळी कोरोना स्थितीबाबत सामान्य जनतेची दिशाभूल होईल अशा पद्धतीची माहिती प्रसारीत करण्यात गुंग आहेत. या स्थितीचा राजकीय फायदा उठविण्याच्या हेतूनेच जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न चालू आहेत, याचा मला मनस्वी खेद वाटतो आहे. या प्रयत्नांत आपल्या पक्षाची सत्ता असलेल्या काही राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी होत आहेत, हे मोठे दुर्दैव आहे. त्याचवेळी आपल्या पक्षाचे काही नेते, कार्यकर्ते राजकीय मतभेद बाजूला ठेवून कोरोना विरुद्धच्या लढाईत सरकारला साथ देत आहेत, हे मला आवर्जुन नमूद करावेसे वाटते.
(हेही वाचा : म्युकरमायकोसीस म्हणजे काय? काय आहेत लक्षणे? कसे दूर ठेवाल? वाचा उत्तरे…)
कठीण प्रसंगात तरी आपल्या पक्षाने भूमिकेत सातत्य ठेवा!
लसीकरणाबाबत काँग्रेस कार्यकारिणीने केलेल्या टीकेचा उल्लेख करून नड्डा यांनी या पत्रात म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात चालू आहे. प्रगत पाश्चिमात्य देशांपेक्षा आपल्या लसीकरणाचा वेग अधिक आहे. आपल्या देशाच्या लसीकरण धोरणाची अनेक राष्ट्रांनी प्रशंसा केली आहे. काही दिवसांपूर्वी आपल्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी लसीच्या खरेदीचे अधिकार राज्यांनाही देण्यात यावेत अशी मागणी केली होती. आपल्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच लॉकडाऊनची मागणी केली आहे. मात्र गतवर्षी राहुल गांधींनी लॉकडाऊनला प्रखर विरोध केला होता. अशा कठीण प्रसंगात तरी आपल्या पक्षाने भूमिकेत सातत्य ठेवावे, एवढीच अपेक्षा आहे, असेही नड्डा यांनी या पत्रात नमूद केले आहे.
Join Our WhatsApp Community