मुंबई महापालिकेच्या बकरी अड्डा येथील कार्यालयात असलेल्या मुद्रणालयाच्या जागेत आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात आली असली, तरी मुद्रणालयासाठी लागणाऱ्या कागदांसह इतर साहित्यांच्या भांडाराच्या ठिकाणी अशाप्रकारची यंत्रणाच बसवण्यात आली नव्हती. त्यामुळे यातील कागद आणि छपाईसाठी वापरण्यात येणा-या शाईमुळे आगीच्या दुर्घटना घडल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. यासाठी याठिकाणी आता कागदाचेही कमी नुकसान होईल, अशाप्रकारच्या सुक्ष्म जल फवारणीची यंत्रणा बसवण्यात येणार असून, त्यासाठी सव्वा पाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे एका भांडाराच्या जागेवरील या यंत्रणेकरता सव्वा पाच कोटींचा खर्च पाहून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. पण हे अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्यानेच एवढा खर्च असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
आगीचा धोका टाळण्यासाठी निर्णय
मुंबई महापालिकेच्या मुद्रणालयाच्या गोदामामध्ये आता आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात येत आहे. मुद्रणालयात सुक्ष्म जल फवारणी अग्निशमन यंत्राची उभारणी करण्यात येणार असून याची उभारणी, चाचणी आणि कार्यान्वित करणे तसेच त्यासाठी ३ वर्षांची देखभाल यासाठी कंत्राट कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी ५ कोटी २१ लाख रुपयांचा खर्च केला जाणार असून, पावसाळ्यासह हे काम पुढील सहा महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे. यासाठी मॅक एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. महापालिका मुद्रणालयातून महापालिकेतील विविध कार्यालयांना लेखनसामग्रीचा पुरवठा करण्यात येतो. तेथे मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, कच्चे साहित्य, रासायनिक द्रव्यांचा साठा करुन ठेवण्यात येतो. हा साठा बऱ्याच मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून तो ज्वलनशील असल्याने आगीपासून धोका टाळण्यासाठी याठिकाणी योग्य ती अग्निशमन सुविधा पुरवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
(हेही वाचाः मुंबई महापालिकेतील शिवसेना नेत्यांचे मेतकूट जमले!)
असे काम करणार ही यंत्रणा
मुद्रणालयातील गोदामामध्ये ही यंत्रणा उभारली जात असून, ते क्षेत्र कमी असताना त्यासाठी पाच कोटींचा खर्च पाहून अनेकांचे डोळे दिपले आहेत. परंतु याबाबत महापालिका मुद्रणालयाच्या महाव्यवस्थापकांनी ही निविदा विद्युत व यांत्रिक विभागाच्यावतीने काढण्यात आल्याचे म्हटले आहे. याबाबत आमच्याच विभागाने पत्र दिले होते आणि अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी याबाबत आढावा घेताना, आगीच्या दुघर्टनेचा धोका टाळण्यासाठी तातडीने हे काम करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही सुक्ष्म फवारणी असून यामुळे यातील कागद भिजून मोठे नुकसान होणार नाही. तसेच मॉलेक्युलर लेवलनुसार ज्याठिकाणी आगीची घटना घडेल तेथीलच स्प्रिंकलर्स सुरू होतील आणि आग नियंत्रणात राहून ती विझण्यास मदत होईल.
(हेही वाचाः कोविडच्या नावाखाली स्मशानभूमीतील कंत्राटदारांना वाढीव कंत्राट!)
Join Our WhatsApp Community